palghar ; पालघर जवळील माहीम-केळवे लघूपाटबंधारे योजनेतील झांजरोळी धरणाच्या भिंतीला भगदाड पडल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे. या घटनेमुळे धरणाच्या खालील बाजूस राहणार्‍या नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. धरणाखालील नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरवात करण्यात आली आहे. बंधार्‍यातील पाणीसाठा हळूहळू कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत. तर भगदाड पडलेल्या भिंतीच्या दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर सूरू आहे.  


झांजरोळी धरणाची पाणीसाठवण क्षमता 3.135 दशलक्ष घनमीटर असून सध्या धरणात 2.600 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा आहे. या धरणातून केळवे आणि सफाळे परीसरातील गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करण्यात येत येतो. खालच्या बाजुच्या गावांना शेतीसाठी देखील पाणी सोडले जाते. 


झांजरोळी धरणाच्या कालव्याच्या मुख्य विमोचकाच्या भिंतीच्या शीर्षक बाजूस गळती सुरू असल्याची बाब स्थानिकांनी पाटबंधारे विभागास लक्षात आणून दिली. त्यानंतर नाशिक येथील धरण सुरक्षा विभागास कळविण्यात आले. त्यानुसार धरण सुरक्षा विभागाने गळती होत असलेल्या भिंतीची पाहणी करून पाणी हळूहळू कमी करण्याच्या सूचना पालघर पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. 


दरम्यान, भिंतीला पडलेल्या भगदाडाचा आकार सातत्याने वाढून गळती देखील वाढत आहे. उतार ढासळू लागल्याने धरणाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे पालघर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या खालच्या बाजूस असलेले पठारपाडा, पाटीलपाडा, झांजरोळी, केळवेरोड, मायखोप या गावपाड्यातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरवात करण्यात आली आहे. त्याबरोबरच एनडीआरएफच्या तुकडीला देखील पाचारण करण्यात आले आहे.


महत्वाच्या बातम्या