रत्नागिरी : सह्याद्रीच्या खोऱ्यातील तीवरे गाव. या गावाच्या तिन्ही बाजूंनी उंच उंच डोंगर आणि याच डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं तीवरे गाव. 2 जुलै 2019 ला तीवरे गावाचं धरण फुटलं आणि त्यात 14 घरं वाहून गेली. या दुर्घटनेत निष्पाप 24 जणांचा मृत्यू झाला. आज दोन वर्षे पूर्ण झाली. हळूहळू कसं बसं या काळाच्या घाल्यातून बाहेर येत असताना, सावरताना पुन्हा एक आस्मानी संकट तीवरे गावावर येउन उभं राहिलं आहे.


धरणफुटीनंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा तिवरे गावाला अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे. 22 जुलैनंतर दरडींची टांगती तलवार गावांवर कायम असतानाच 24 लाख खर्चून तीन महिन्यांपूर्वीच सुरु झालेला नवा पूल रस्त्यासह वाहून गेला आहे. नव्यानं करण्यात आलेली पाणीयोजनाही पुरती उद्ध्वस्थ झाली आहे. धरणफुटीनंतर दोन वर्षांनी भातशेती बहरली. मात्र पुन्हा त्यामध्ये दगडगोट्यांसह मातीचा ढिगारा येऊन बसला आहे. निसर्ग का बरं आमच्यावर एवढा कोपला आहे, असा सवाल आता तेथील नागरिक विचारू लागले आहेत.  



चिपळूण तालुक्याचं शेवटचं टोक असलेलं आणि सह्याद्रीच्या खोऱ्यातील पायथ्याशी वसलेल्या या तिवरे गावात दोन वर्षांपूर्वी झालेल्या धरणफुटीत मोठी आर्थिक तसेच जीवितहानी झाल्यानंतर गाव हळूहळू सावरत असतानाच 22 जुलैच्या ऐतिहासिक अतिवृष्टीत या गावाची पुरती वाताहात झाली. गावच्या तीनही दिशेला असलेल्या डोंगराना मोठमोठ्या भेगा जाऊन काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. सद्यस्थिती जीवितहानी झालेली नसली तरी धोक्याची टांगती तलवार मात्र कायम राहिली आहे. 
 
यासंदर्भात एबीपी माझाच्या टीमनं शनिवारी तिवरे गावात जाऊन वस्तूस्थितीची पहाणी केली असता तेथील चित्र भयानक आहे. एकूण दीड हजारांच्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या या गावात 9 वाड्या असून सध्या 370 व्यक्ती या 22 जुलैपासून गावच्या मंदिरात तसेच धरणग्रस्तांसाठी आणलेल्या कंटेनर केबिनमध्ये आणि अंगणवाडीमध्ये राहत आहेत. स्थलांतरीत करण्यात आलेल्या या लोकांना प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. गावातील रस्त्यावर, लागवड केलेल्या शेतीमध्ये कोसळलेल्या दरडी येऊन विसावल्या आहेत. ठिकठिकाणी मोठमोठी झाडं कोसळली आहेत. अतिवृष्टीनं गावातील ग्रामस्थांची झोपच उडवली आहे.   




   
धरणफुटीनंतर सुमारे 20 लाख खर्चून नव्यानं पाणी योजना करण्यात आली. मात्र यावेळी पाण्याच्या लोंढ्यानं या योजनेची पाईपलाईन पुरती उद्ध्वस्थ करून टाकली आहे. गंगेचीवाडी येथील नदीच्या पाण्याचा प्रवाह पूर्णत: बदलला असून तो शेतीतून नव्याने बाहेर पडला आहे. नद्यांमध्ये वाहून आलेल्या दगडगोट्यासह गाळामुळे या नद्या की मैदानं, असा प्रश्न पडतो. सध्या तेथील फणसवाडी, भेंदवाडी, धनगरवाडी, गंगेचीवाडी, पुंभारवाडी, गावठण, कातकरवाडी आदी वाड्यांचे स्थलांतर करण्यात आलेलं आहे. घरदार सोडून ही लोकं सध्या जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणच्या आसऱ्याला आली आहेत. ज्याठिकाणी स्थलांतर केले आहे, तिथे सध्या एकत्र जेवण करून ते सर्व दिवस ढकलत आहेत. 
  
नवा पूल गेला वाहून  


धरणफुटीनंतर भेंदवाडी ते फणसवाडी यांना जोडणाऱ्या पुलासाठी 24 लाख रूपये मंजूर झाले. नुकताच हा पूल पूर्ण होऊन वाहतूकही सुरु झाली होती. मात्र हा अर्धा पूलही पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेला आहे. पलिकडचा रस्ताही पूर्णपणे वाहून गेल्यानं सध्या पलिकडच्या फणसवाडीत जाण्यासाठी मार्गच बंद झालेला आहे. तेथील वाहनंही अडकून पडली आहेत. 


यासंदर्भात तेथील ग्रामस्थ मंगेश शिंदे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, दरडींच्या धोक्यामुळं प्रशासनानं पुनर्वसनासाठी जागा शोधण्यास सांगितलं आहे. त्यानुसार जागांचा शोध सुरु आहे. मात्र दुसरीकडे घरास घर देणार असल्याचं सांगत आहेत. मात्र एकेका घरात चार-चार कुटुंबं आहेत. त्यांच्या घरपट्टी वेगवेगळ्या असल्यानं घरपट्टीप्रमाणं त्यांना घरं मिळायला हवीत. गंगेचीवाडी येथील वसंत पांचागणे यांनी सांगितले की,दोन वर्षापूर्वी धरण फुटलं, नंतर वादळाचा फटका बसला. तरीही त्यातून आता कुठे बाहेर पडत असतानाच ही नवी आपत्ती आली आहे. निसर्ग कोपल्यागत एकामागून एक संकटं गावावर येत आहेत. तसेच, विष्णू पवार यांनी नदीचा प्रवाह बदलून तो शेतीतून गेल्यानं शेतकऱ्यांचे नुकसान झालं असून नुकसानीचं हे शुक्लकाष्ठ कधी थांबणार,असा सवाल केला आहे.
  
अहवालानंतर कायमस्वरूपी पुनर्वसनाचा निर्णय 
  
दरम्यान, तिवरे येथील दरडग्रस्त भागाची पुणे येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण विभागाकडून पहाणी करण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालानंतर ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तरीही त्यादृष्टीने पुनर्वसनासाठी जागांचा शोध सुरु करण्यात आला आहे, असं चिपळूणचे तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी सांगितलं.