मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. जर नागरिकांनी काळजी घेतली नाही तर परिणाम भोगावे लागतील असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. रुग्ण वाढणे हा काळजीचा विषय असून, निर्बंधाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. नागरिकांनी जर काळजी घेतली नाही तर पुन्हा निर्बंध आणावे लागतील असेही ते म्हणाले.


लसीकरणाचा वेग कमी
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात 2 हजारांच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. मुंबईत दररोज 51 हजार कोरोना चाचण्या केल्या  जात आहेत. यामध्ये पॉझिटीव्ह रेट हा 4 टक्के आहे, ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. दिल्लीत बऱ्यापैकी निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यात सध्या 11 हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आहेत. तर 167 हे ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत, त्यातील 97 रुग्ण हे बरे झाले आहेत. त्यामुळे निर्बंध लावण्याची शक्यता पडू शकते असे टोपे म्हणाले. लसीकरण जास्तीत जास्त होणे गरजेचे आहे. दिवसाला 8 लाखांच्या आसपास लसीकरण होत होते, मात्र, सध्या हे लसीकरण दिवसाला 5 लाखांवर आले आहे. लसीकरणाचा कमी झालेला वेग वाढवावा लागेल. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे टोपे यांनी सांगितले.  आता सर्वांनीच लसीकरणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य विभाग तर काम करतच आहे. मात्र, स्थानिक नेते, प्रशासन आणि एनजीओ यांनी हातात हात घालून काम करावे असे आवाहन टोपे यांनी केले आहे.


राज्यात आत्तापर्यंत 13 कोटी 31 लाख 90 हजार लसीकरणाचे डोस दिले आहेत. राज्यातील 87 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. म्हणजे जवळपास 8 कोटी लोकांनी पहिला लसीचा डोस घेतला आहे. अद्याप 1 कोटी लोकांना लसीकरण बाकी असल्याचे टोपे म्हणाले. तर 57 टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. म्हणजे साडेपाच कोटी लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात असल्याची माहिती टोपे यांनी दिली.


विद्यार्थ्यांना लस देण्यास राज्य सरकार सज्ज
3 जानेवारीपासून केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटातील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार देखील यासाठी सज्ज असल्याचे टोपे यांनी सांगितले. 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे सर्व नियोजन सुरू आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाऊनच लस देण्यासाठीचे नियोजन करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे टोपे यांनी सांगितले. बुस्टर डोसच्या बाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही. नेमकी कोणती लस घ्यायची हे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले नसल्याटे टोपे यावेळी म्हणाले.