उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करताना शेतकऱ्यांच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या दिल्या आणि फोटो काढले. सराईत गुन्हेगाराच्या हातात त्याच्या नावाची जशी पाटी देतात, तशी पाटी शेतकऱ्यांच्या हातात देण्यात आली.
प्रशासनाने केलेल्या या प्रतापानंतर शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल, हे मात्र अनुत्तरित आहे. पारदर्शक कारभाराचा नाहक त्रास शेतकऱ्यांना होत आहे. यातून सरकारला काय साध्य करायचे आहे, असे शेतकरी विचारत आहेत.
मुळात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची शहानिशा करण्यासाठी आधार कार्डसह व इतर पर्याय उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांच्या हातात नावाची पाटी देऊन त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे.
अशोक चव्हाणांची टीका
“सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का? गारपीट पंचनामे म्हणजे सुलतानी पंचनामे आहेत.”, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.