पुणे/नवी दिल्ली : कोरेगाव-भीमा प्रकरणात आज मिलिंद एकबोटे यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांना अटक होते की पुन्हा दिलासा मिळतो, हे पाहणं महत्वाचं आहे.
याआधी मुंबई उच्च न्यायालयानं एकबोटे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. पण सुप्रीम कोर्टानं त्यांना 20 तारखेपर्यंत अटक करण्यापासून संरक्षण दिलं होतं. त्यानंतर आज याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा इथे शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या लोकांवर जमावानं हल्ला केला, त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी चिथावल्याचा आरोप आहे.
एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण?
एक जानेवारीला कोरेगाव भीमा इथं शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर सणसवाडीत दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांनी चिथावल्याचा आरोप आहे. एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत.
ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेस आपण तिथं नव्हतो, तसेच आपल्या झालेल्या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचा दावा एकबोटे यांनी केला आहे. एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील सत्र न्यायालयाने 22 जानेवारीला फेटाळला. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टानेही दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर मिलिंद एकबोटेंनी सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.