औरंगाबाद : भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. खडसेंच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा हायकोर्टाने रद्द केला आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती नलावडे आणि न्यायमूर्ती विभा कंकनवाडी यांच्यासमोर सोमवारी या प्रकरणावर सुनावणी झाली. खडसेंनी केलेल्या तक्रारीवरून अंजली दमानिया यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे.

अंजली दमानिया व इतर पाच जणांनी हायकोर्टात खडसेंविरोधात आर्थिक गैरव्यवहार केल्याबद्दल डिसेंबर २०१६ मध्ये एक याचिका दाखल केली होती. त्यात एका राष्ट्रीयकृत बँकेचा ९.५ कोटींचा तर एका सहकारी बँकेचा १० लाख रुपयांच्या दोन डिमांड ड्राफ्टच्या (डीडी) प्रती सादर केल्या होत्या. या घटनेच्या तब्बल १५ महिन्यानंतर खडसेंनी ते डीडी दमानिया व इतर याचिककर्त्यांनी बँकांमधून चोरले होते. तसेच त्यात गडबड करून खोटी कागदपत्रं सादर केली, अशी तक्रार मुक्ताईनगर पोलिसांत केली होती. त्यानुसार पोलिसांनी अंजली दमानिया व अन्य पाच जणांवर १३ जून २०१८ रोजी गुन्हा दाखल केला होता.

मे २०१८ रोजी अंजली दमानिया यांनी पुणे लाचलुचपत विभागाने खडसेंना दिलेल्या क्लीन चिटविरोधात अपील केले आहे. औरंगाबाद खंडपीठापुढे सुरू असलेल्या सुनावणीत अंजली दमानिया यांनी स्वतः युक्तिवाद केला.

या संपूर्ण प्रकारावर भाष्य करताना एकनाथ खडसे म्हणाले की, "मी अंजली दमानिया यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे. अंजली दमानिया यांनी माझ्या विरोधातल्या PIL मध्ये कोट्यावधी रूपयांचे खोटे चेक जोडले होते. यामुळे मुक्ताईनगर पोलिसांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा रद्द केला असल्यामुळे मी आता सुप्रीम कोर्टात जाणार.