बीड : शहरामध्ये आयकर चुकवून टोकण पद्धतीने पैशाची देवाण-घेवाण करणाऱ्या एका हवाला रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने बीड शहरात तीन ठिकाणी धाडी टाकून तिघांना ताब्यात घेत तब्बल 51 लाख रुपयांची बेहिशोबी रक्कमही हस्तगत केली आहे.
बीड शहरामध्ये बेकायदेशीररीत्या हवाला रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक रवाना केले. या पथकाने शहरातील कबाडगल्लीतील न्यू इंडिया अंगडिया, जालना रोडवरील आर क्रांती ट्रेडर्स आणि सिध्दीविनायक कॉम्प्लेक्ससमोरील एका ठिकाणी छापा टाकला. यात अनुक्रमे 35 लाख 79 हजार रुपये, 9 लाख रुपये, 6 लाख 41 हजार रुपये अशी एकूण 51 लाख 26 हजार रुपयांची बेकायदेशीर रोकड आढळून आली. याबाबत त्याठिकाणी असणाऱ्यांना विचारपूस केली तेव्हा त्यांना हिशेब देता आला नाही. मयूर विठ्ठल बोबडे, हरीश रतीलाल पटेल, सूरज पांडुरंग घाडगे अशी त्यांची नावे आहेत. यासोबतच तिन्ही ठिकाणच्या व्यवस्थापकांना ताब्यात घेतले आहे.
हवाला रॅकेटमध्ये आणखी काही जणांवर संशय
हवाला रॅकेटद्वारे पैशांची फिरवा फिरवी करणारे आणखी काही संशयित पोलिसांच्या रडावर आले आहेत. ताब्यात घेतलेल्या तीन जणांना पैसे फिरवण्यास कुणी सांगितले, हे पैसे ते कुणाला देणार होते याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत. त्यांच्या चौकशीतून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.
पैसे मोजण्याचे यंत्र, मोबाइल जप्त
ज्या ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशाचा व्यवहार होत असल्याने शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण कारवाई दरम्यान पैसे मोजण्याचे यंत्र, मोबाइल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. हवाला रॅकेटचे इतर ठिकाणचे कनेक्शन देखील या कारवाईमुळे समोर येण्याची शक्यता आहे. थेट कार्यालय थाटून हवाला रॅकेट सुरु असल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.
आयकर विभागाला देणार पत्र
या कारवाईत पकडलेल्या तिन्ही संशयितांकडे कसून चौकशी पोलिस करत आहेत. हवाला रॅकेट कसे चालायचे, किती रुपयांचा व्यवहार व्हायचा, कमिशन किती मिळायचे? या सर्वाबाबत चौकशीतून योग्य माहिती निष्पन्न होईल. पोलीस आयकर विभागाला पत्र देणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा -
- Beed: बीड जिल्ह्यात कत्तलखान्यांवर महिनाभरात चार कारवाया, 32 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Beed: कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीच्या बीड महिला जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल; आरोप खोटे असल्याचा जिल्हाध्यक्षांचा दावा
- बीड प्रशासनाचा तुघलकी कारभार! आता तर हद्दच झाली, क्रीडा संकुलातील चार झाडे पुन्हा तोडली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha