कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या अनेक दिवसांपासून माजी मंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रकं काढून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. नुकतीच चंद्रकात पाटील यांनी केलेल्या टीकेला हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "आ बैल मुझे मार हे माझं नाही, मी फक्त बैलाची शिंगं पकडलीत", असा पलटवार मुश्रीफ यांनी केला आहे.


चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात चांगलीच पत्रकबाजी गेल्या 15 दिवसांपासून पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी टीका करताना "मुख्यमंत्री काही बोलत नाहीत, जयंत पाटील काही बोलत नाही मात्र हसन मुश्रीफ लगेच बोलायला लागतात, हे म्हणजे आ बैल मुझे मार" असा प्रकार असल्याचं दादांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना आज हसन मुश्रीफ म्हणाले की, आ बैल मुझे मार हे काय माझं नाही, मी फक्त बैलाची शिंगं पकडली आहेत.


आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना हसन मुश्रीफ यांनी चंद्रकात पाटील यांना आवाहन केलं, "तुम्ही केलेल्या चुकीच्या आरोपांबद्दल माफी मागा आज मी पत्रकबाजीचा शेवट करतो". चंद्रकांत पाटील यांनी अर्सेनिक अल्बम 30, अधिकाऱ्यांच्या बदल्या यावरुन टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना मुश्रीफ म्हणाले की, "काही अधिकारी खाललेल्या मिठाला जागत होते. त्यामुळे 15 टक्के अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत".


कोल्हापूर जिल्हा परिषदेला आणि खास करुन मुश्रीफांच्या कागलला दिलेल्या निधीबद्दल विचारलं असता ते म्हणाले, " खोरं थोडी माती आपल्याकडे ओढतंच". म्हणतं विरोधकांना गप्प केलं. खरेदीच्या सगळ्या व्यवहारात प्रशासकीय अधिकारी आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक बोलावली जाणार असल्याचंही हसन मुश्रीफ म्हणालेत.