sangli news updates:   'बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत!' अशी चारोळी बोलून दाखवलीय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी. महाविकास आघाडीच्या सरकार  स्थापनेची आठवण सांगताना  ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही चारोळी करून दाखवली आणि कार्यक्रमात एकच हशा पिकला. इस्लामपूर पंचायत समितीच्या आवारातील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण आणि शिक्षण विभागाच्या ई-लर्निंग डिजिटल स्टुडिओचे उद्घाटन हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.


यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकानंतर आम्ही सत्तेत येणार नाही असे वाटत असताना आम्ही सत्तेत कसे आलो याचा किस्सा सांगताना ही चारोळी ठोकली. यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम , महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


मुश्रीफ म्हणाले की, 2019च्या विधानसभा निवडणुकानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री हा शब्द भाजपने पाळला नाही. त्यामुळे शरद पवाराच्या चाणक्यनीतीने आणि जयंत पाटील यांच्या सहकार्याने राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. मात्र या सत्ता स्थापनेच्या घडामोडी ज्या महिन्यात  घडत  होत्या. त्या 2019 सालच्या ऑक्टोबर महिन्यात 'बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत!' अशी परिस्थिती होती असे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. 


मुश्रीफ म्हणाले की,  2019 साली विधानसभेच्या निवडणूका झाल्या आणि या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे 105 आणि शिवसेना पक्षाचे 56 आमदार निवडून आले. या दोन्ही पक्षाची निवडणूकपूर्व युती होती. असं सगळं चित्र असताना राष्ट्रवादी पक्षाची पुन्हा सत्ता येईल असं वाटले नव्हते. आपल्याला पुन्हा 5 वर्ष विरोधी पक्ष म्हणून काम करावं लागणार अशी धारणा जवळपास सर्व राष्ट्रवादीच्या नेत्याची झाली होती. पण राष्ट्रवादी पक्ष पुन्हा विरोधी बाकावर बसावा हे बहुतेक नियतीला मान्य नव्हते. 2019 सालच्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील राजकारणात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडत गेल्या. त्या ऑक्टोबर महिन्यात फार मोठा पाऊस पडत होता. आपल्याला विरोधी पक्षात बसावे लागणार असे वाटत असल्याने राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार मुंबईला न जाता त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात होते. त्यावेळी प्रचंड पाऊस राज्यात पडत होता. त्यावेळी बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत अशी परिस्थिती होती असे मुश्रीफ म्हणाले.