सिंचन घोटाळ्यामुळेच आघाडीची सत्ता गेली: हर्षवर्धन पाटील
एबीपी माझा वेब टीम | 11 Nov 2016 03:11 PM (IST)
इंदापूर: सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा केल्यामुळेच आघाडी सरकारची सत्ता गेली असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांवर केला आहे. 'अजित पवार यांनी जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना विकत घेतला. १२० कोटीचा कारखाना अवघ्या ७ कोटीला अजित पवारांनी विकत घेतला असा आरोप राजू शेट्टी करत आहेत. त्यांचा आरोप खरा आहे.' असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले. पाच नोव्हेंबरला राष्ट्रावादीचा शेतकरी मेळावा इंदापूरात झाला होता त्यात अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर सडकून टिका केली होती. हर्षवर्धन पाटील यांना त्यांच्या तालुक्यातील सहकारी संस्था नीट चालविता येत नाहीत, अनेक संस्था या त्यांच्या डबघाईला आल्या आहेत, अशी टीका पवारांनी इंदापूरमधील मेळाव्यात केली होती. पवारांच्या या टीकेवर हर्षवर्धन पाटलांनी देखील पलटवार केला आहे.