नवी दिल्ली: ठाण्याच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून लवकरच मालवाहू ट्रकांची रेल्वेच्या मालगाडीवरुन वाहतूक सुरु झाली, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण यासंदर्भातलं निवेदन राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी, रेल्वेमंत्र्यांना दिलेलं असून त्यावर गांभीर्यानं विचार करुन फेब्रुवारीपर्यंत अंतिम रुप द्यायचं आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिलं आहे.

रो-रो अर्थात रोल ऑन रोल ऑफ असं या वाहतूक प्रकाराला म्हटलं जातं. अहमदाबाद, आग्रा हायवेवरुन येणा-या सगळ्या गाड्या, शिवाय ठाणे-बेलापूर एमआयडीसीही याच परिसरात वसल्यानं अवजड ट्रकची वाहतूक ठाण्याच्या प्रदूषणाचं, ट्रॅफिक जामचं प्रमुख कारण आहे.

त्यावर उपाय म्हणून वसई रोड इथूनच या अवजड ट्रक्सना रेल्वेच्या वाघिणीवर बसवून भिवंडी, पनवेल, उरण या मार्गानं जेएनपीटी बंदरापर्यंत नेण्यात यावं असा प्रस्ताव देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे अवजड ट्रकांची अशी वाहतूक सध्या कोकण रेल्वेच्या माणगाव पासून सुरु होणाऱ्या ट्रॅकवरती उपलब्ध असल्याचं सहस्त्रबुद्धे यांनी म्हटलंय. त्याच धर्तीवर ही सेवा सुरु करावी अशी मागणी त्यांनी केलीय.

ठाण्या शेजारीच वसलेलं भिवंडी हे महाराष्ट्र सरकारसाठी गोदामांचं शहर म्हणून विकसित होतंय. लवकरच भिवंडीमधल्या गोदामांची संख्या 50 हजारापर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे जवळपास 4 ते  5 लाख अवजड वाहनांची भर पडून ट्रॅफिक 30 टक्के वाढण्याची शक्यता आहे.

त्याचा विचार करता हा उपाय रेल्वेनं योजनं महत्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय. ही वाहतूक सुरु करण्यासाठी वसई रोड या स्टेशनवर ट्रकांना प्लॅटफॉर्मवर नेण्यासाठी एक रस्ताही बनवावा लागणार आहे.

रेल्वेनं सकारात्मक प्रतिसाद दिल्यास लवकरच अशी अभिनव वाहतूक सुरु होऊन ठाणेकरांना दिलासा मिळू शकतो.