धुळे : शाळा डिजीटल होऊनही विजेच्या समस्येमुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही. या समस्येवर उपाय म्हणून हर्षल विभांडीक या तरुणाने आदिवासी पाड्यावरील शाळांना विजेची समस्या उद्भवू नये यासाठी पुढाकार घेतला आहे. याचाच भाग म्हणून धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागातील दहा शाळांना सौर ऊर्जा पॅनलचं वाटप करण्यात आलं.

शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथील जिल्हा परिषदेच्या प्रागंणात झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील दहा जिल्हा परिषदेच्या शाळांना सौर ऊर्जा पॅनलचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, धुळ्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची उपस्थिती होती.

डिजीटल शाळेचा धुळे पॅटर्न सरकार आता संपूर्ण देशात राबवण्याच्या विचारात आहे. मात्र असं असताना धुळे जिल्ह्यातील काही आदिवासी पाड्यांवर उद्भवणाऱ्या विजेच्या समस्येमुळे तेथील विद्यार्थ्यांना डिजीटल माध्यमातून शिक्षण मिळवण्यात अडचणी येतात. यावर उपाय म्हणून हर्षल विभांडीक यांनी केवळ शिरपूरमधीलच नव्हे, तर धुळे जिल्ह्यातील, राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यातील शाळा डिजीटल केल्या आहेत.

लाकड्या हनुमान येथे जिल्हा परिषदेच्या दहा शाळांना सौर पॅनल वाटप कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली. राजीव खांडेकर, राहुल रेखावार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. गावातील मृत झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्याची एक नवी प्रथा यावेळी सुरु करण्यात आली. उपस्थित पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना राजीव खांडेकर यांनी हर्षल विभांडीक यांच्या कार्याचं कौतुक केलं. काम करताना जो उत्साह सुरुवातीला असतो, तोच उत्साह शेवटपर्यंत कायम असावा, असं म्हणत हर्षल विभांडीक यांना मिळालेली इतरांची साथही महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले.

चांगले नागरिक घडवण्याची जबाबदारी ही जशी शिक्षकांची, तसं चांगलं नागरिक व्हायचं असं म्हणताना ऐकायला मिळत नाही, अशी खंत राजीव खांडेकर यांनी व्यक्त केली.