नांदेड: नांदेड शहरातील दीपक नगर भागात आज एक हँड ग्रेनेड सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. या परिसरात राहणाऱ्या मिनाबाई भुजागडे यांनी चूल पेटवण्यासाठी नारळाच्या शेंड्या आणि कचरा जमवला होता, यावेळी कचऱ्यात त्यांना एक संशयास्पद वस्तू दिसली.

 

ही वस्तू विचित्र वाटल्यानं त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आण बॉम्बशोधक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. पूर्ण तपासणी केली असता ही वस्तू हँड ग्रेनेड असल्याचं स्पष्ट झालं.

 

बरेच दिवस हे हँड ग्रेनेड कचऱ्यात पडून राहिल्यामुळे याची तीव्रता कमी झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी निर्मनुष्य ठिकाणी या ग्रेनेडचा स्फोट करुन त्याला निकामी केलं. सध्या हे हँड ग्रेनेड नेमकं या जागी कसं आलं याचा तपास पोलिस करत आहेत.