वाशीम : सध्या वाशीम जिल्ह्यातील एक बोकड चर्चेचा विषय बनला आहे. हा काही साधा बोकड नाही, हा लाखमोलाचा बोकड आहे. या बोकडाची किंमत ऐकून भल्याभल्यांची झोप उडाली आहे. या बोकडाची किंमत तब्बल 11.75 लाख रुपये आहे. हा बोकड वाशीम जिल्ह्यातील खडकी ढंगारे गावातील जीजेबा खंदारे यांच्या मालकीचा आहे.


जीजेबा खंदारे यांच्या शेळीने दीड वर्षांपूर्वी दोन पिल्लांना जन्म दिला आणि त्यापैकी हा एक बोकड लाखमोलाचा आहे. त्याचे कारण म्हणजे या बोकडाच्या डोक्यावर जन्मतःच अर्धचंद्राची खून आहे. मुस्लीम धर्मामध्ये अशा बोकडाच्या कुर्बानीला फार महत्त्व आहे. त्यामुळे या बोकडाची किंमत नक्कीच वाढणार आहे.

बकरी ईद आता जवळ आली आहे. या दिवशी मुस्लीम बांधव बकऱ्याची/बोकडाची कुर्बानी देतात. त्यातही ज्या बोकडांच्या अंगावर चंद्र, चांदण्यांच्या खुणा असतील, कुर्बानीसाठी अशा बोकडांना अधिक मागणी असते. त्यामुळे या बोकडांना मोठी किंमत मिळते.

जीजेबा यांचा मुलगा सचिन याने त्यांच्या बोकडाचे फोटो आणि व्हिडीओ व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टिकटॉकवर शेअर केले. त्याची मोठी जाहिरात केली. त्यानंतर हैद्राबाद येथील एका मुस्लीम बकरी व्यापाऱ्याने 11.75 लाख रुपयांमध्ये या बोकडाची मागणी केली आहे. परंतु सचिनच्या मते या बोकडाला 18 लाखांहून अधिक किंमत मिळेल.

पुढील महिन्यात बकरी ईद आहे. त्यानिमित्त कुर्बानीसाठी अंगावर चंद्र-ताऱ्यांच्या खुणा असलेल्या बोकडांना अधिक किंमत मिळते. त्यामुळे या बोकडाला किती किंमत मिळते, हे येणारा काळच ठरवेल.