नांदेड : 'सारे शिकूया, पुढे जाऊया' हे ब्रीदवाक्य घेऊन सर्व शिक्षा अभियान सर्वत्र राबवले जात आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवली जातात. मात्र अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आलं तरी शिक्षणमंत्र्यांच्या सिंधुदुर्गात अनेक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकच मिळाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.


शालेय शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तर अनेक शाळांमध्ये प्रथम सत्र परीक्षेपर्यंतचा अभ्यासक्रम देखील शिकवून झाला आहे. मात्र कासार्डे माध्यमिक विद्या मंदिरमधील पाचवी ते आठवीच्या 859 विद्यार्थ्यांना पुस्तकच मिळाली नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यापासून पुस्तकाविनाच शिकण्याची नामुष्की ओढावली आहे.


विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र तरीसुद्धा चार महिने उलटूनही विद्यार्थाना पुस्तकं मिळालेली नाहीत. त्यामुळे अभ्यास कसा करावा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. तर विद्यार्थ्यांच्या शक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? असाही सवाल विचारला जात आहे.


दरम्यान तीन वेळा शिक्षण विभागाकडे पुस्तकांची मागणी करून देखील पुस्तके उपलब्ध करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे कासार्डे विद्यामंदिरच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.


एकीकडे शालेय विद्यार्थ्यांची गळती होऊ नये म्हणून सरकारकडून प्रयत्न केले जातात. तर दुसरीकडे शाळेकडे वळलेल्या विद्यार्थ्यांना यंत्रणेच्या उदासीनतेचा फटका बसतो आहे. विशेष म्हणजे शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच पुस्तकांविना शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. त्यामुळे इतर ठिकाणच्या परिस्थितीची कल्पना न केलेलीच बरी.