उस्मानाबाद : क्रिकेट खेळण्यावरुन झालेलं भांडण मिटवणाऱ्याचीच हत्या केल्याची घटना उस्मानाबादेतील गोरोबा काकानगर येथे समोर आली आहे. आकाश गंगावणे असं या मृत व्यक्तीच नाव आहे.

गोरोबा काकानगर येथे राहणाऱ्या दोन संघात मंगळवारी क्रिकेटचा सामना झाला. यात एक संघ सामना हरला. हरलेल्या संघाने पुन्हा सामना खेळण्याची विनंती विजयी संघाला केली. यावरुन या दोन्ही गटात वाद सुरू झाला. हा वाद मिटवण्यासाठी आकाश गंगावणे ह्याने मध्यस्थी केली.

आकाशने मध्यस्थी केल्यामुळे काहीजणांना या गोष्टीचा राग आला. हाच राग मनात धरून सात ते आठ जण मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान आकाशच्या घरी गेले. तेथे जाऊन त्यांनी आई वडिलांसमोरच आकाशला मारहाण केली. नंतर त्यांनी आकाशच्या पोटात चाकू खुपसला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या तब्येतीत फारशी सुधारणा झाली नाही. तब्येत खालावत असल्यामुळे आकाशला पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवण्यात आले होते.

उपचार सुरु असताना शुक्रवार सकाळी 10 वाजता आकाशचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना समजताच सगळ्यांनी एकत्र येऊन उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या.

हे प्रकरण उघडकीस येऊन सुद्धा पोलिसांनी त्यावर तात्काळ कारवाई केली नाही. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी, तसचं आरोपींची साथ देणाऱ्या गोरोबा काकानगरच्या बिट पोलीस अधिकाऱ्याचे त्वरित निलंबन करावं अशी मागणी नातेवाईकांनी केली.

मुख्य आरोपी लिंबाराज डुकरे याचे एक नंबरचा आरोपी म्हणून नाव घोषित करावे. तसेच त्याला मदत करणाऱ्या राजकीय नेत्यालाही अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली.  या मागणींसाठीच हे आंदोलन करण्यात आले होते.

नातेवाईकांचा आक्रोश लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी आरोपीना  24 तासात अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतरच नातेवाईकानी जिल्हाधिकारी कार्यालय सोडले.