हिंगोली: हिंगोलीत तिसरीत शिकणाऱ्या मुलीकडे एक देशी कट्टा आणि 9 जिवंत काडतुसं सापडली आहेत. शाळेत तिच्या मैत्रीणीला ती कट्टा दाखवत असताना शिक्षकांनी पाहिलं. त्यानंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा कट्टा तिच्या वडिलांचा असल्याचे तिनं सांगितलं.
हिंगोली शहर पोलिसांनी तात्काळ देशी कट्टा आणि काडतुसं जप्त केली. मुलीचे वडिल सय्यद मुश्ताक सय्यद आझम हे माजी सैनिक आहेत. परंतु त्यांनी बेकायदेशीररित्या कट्टा घरात ठेवलाच कसा असा प्रश्न निर्माण होतो आहे? त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
८ वर्षाच्या मुलीकडे शाळेत देशी कट्टा सापडल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात सय्यद मुश्ताक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.