Nagpur: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain barre syndrome)रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पुण्यात जीबीएसने थैमान घातलं असून आत्तापर्यंत 8 जणांचा बळी गेलाय. नागपुरातही जीबीएसचा कहर वाढताना दिसतोय. नागपूरच्या पारडी शिवारात राहणाऱ्या 45 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी जीबीएसमुळे मृत्यू झाला. (Nagpur)या रुग्णाला 11 फेब्रुवारीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाच्या दोन्ही हातापायाला लकवा मारला होता. श्वास घेण्यासही त्रास होत होता. शिवाय रक्तदाबाचा हे त्रास असल्याने प्रकृती अधिक बिघडल्याने शुक्रवारी सायंकाळी शासकीय रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये रूग्ण दगावला.दरम्यान नागपुरात आणखीन 2 रुग्ण सध्या आयसीयूमध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमवर उपचार घेत आहेत. (GBS)

गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain barre syndrome) या मेंदू विषयक आजाराच्या रुग्ण संख्येने 200 चा टप्पा ओलांडला आहे. राज्यात 13 फेब्रुवारी रोजी जीबीएसची रुग्णसंख्या 203 एवढी होती. पुण्यानंतर कोल्हापूर आणि नागपुरातही जीबीएसच्या रुग्णांची संख्या वाढती असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही असे वारंवार प्रशासन आणि राज्य सरकारकडून सातत्याने सांगितले जात आहे. 

 

 गुलेन बॅरी सिंड्रोमची लक्षणे

  • अचानक हातापायातील त्राण जाणे .अशक्तपणा दुर्बलता किंवा लकवा बसणे
  • अचानक चालताना अशक्तपणा आणि त्रास उद्भवणे
  • जास्त दिवसांचा अतिसार (डायरिया ) आणि ताप

नागरिकांनी काय काळजी घ्यावी ?

  • पिण्याचे पाणी उकळून प्यावे
  • स्वच्छ व ताजे अन्न खावे
  • शिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्रित ठेवू नये
  • वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा
  • हात किंवा पायामध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा

गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजे काय ?

गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मीळ आजार आहे, ज्यामध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकून स्वतःच्याच स्नायू आणि मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे स्नायू कमजोर होतात, आणि काही गंभीर रुग्णांमध्ये पूर्णपणे पक्षाघात होण्याचीही शक्यता असते. महत्त्वाचं म्हणजे, GBS हा संसर्गजन्य आजार नाही. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होत नाही. याचे नक्की कारण अजूनही स्पष्ट नाही, पण तो बहुतेकदा श्वसन किंवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर विकसित होतो. त्यामुळे त्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे असते. हा आजार काही नवीन नाही. तो अनेक वर्षांपासून ओळखला जात आहे. जरी तो संसर्गजन्य नसला, तरी काही वेळा जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गानंतर दिसून येतो. GBS चे इतरही काही संभाव्य कारणे आहेत. हा आजार वर्षभर आढळतो आणि अंदाजे 1 लाख लोकांमध्ये एखादृयाला बाधताे. त्यामुळे मोठ्या शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये दर महिन्याला GBS चे काही रुग्ण उपचारासाठी येतात. GBS च्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण वेळीच उपचार झाल्यास रुग्णाला गंभीर अवस्थेत जाण्यापासून वाचवता येऊ शकते.

हेही वाचा:

विदर्भात विकासाची योजना तयार, ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटीही होणार, सर्वांनी सहभागी व्हावं, गडकरींचं आवाहन