Maharashtra News : गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2022) सण अवघ्या काही दिवसांवर आहे. याच दरम्यान महाराष्ट्रभर सणाचा उत्साह आणि रेलचेल पाहायला मिळतेय. कोरोना काळात सणांवर काहीसं सावट असतानाच यंदा दोन वर्षानंतर गुढी पाडव्याचा सण राज्यभर निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत आहे. त्यामुळे एकीकडे उत्साहाचे वातावरण असतानाच दुसरीकडे मात्र नागरिकांमध्ये निराशा पाहायला मिळतेय. यंदाच्या वर्षी गुढीला लागणारे नक्षीदार साखरेचे हार तयार करणाऱ्या फक्त चार भट्ट्या सुरु झाल्याने यंदा मोठ्या शहरात पंढरपुरी साखरेचे हार पोहोचू शकणार नाहीत.


गुढी पाडव्याला लागणारे हे साखरेचे हार अर्थात गाठी या पंढरपूर मधून मोठ्या शहरात पुणे मुंबई येथे जात असतात. पांढरे शुभ्र आणि अतिशय पातळ पदक असणारे पंढरपुरी साखरेच्या हारांना मोठ्या शहरात मोठी मागणी असते. यासाठी पंढरपूर मध्ये 12 ते 15 कारखान्यातून हे साखरेचे हार लाकडी साच्यातून बनविण्यात येत असतात. मात्र, जगभर दहशत निर्माण करणाऱ्या कोरोनाच्या भीतीने बाहेरचे कामगार यंदा पंढरपूरमध्ये न पोहोचू शकल्याने यंदा गुजरात येथील साखरेच्या हारावरच आता महाराष्ट्रात अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. पंढरपूर मध्ये दरवर्षी किमान 300 टन सुबक साखरेचे हार बनविले जातात. पण, यंदा कामगार प्रश्नामुळे केवळ 20 टक्के एवढाच माल तयार झाला आहे. त्यामुळे काळपट रंगाचे आणि जाड पदके असलेले गुजराती साखरेचे हार सध्या बाजारात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे पुणे, मुंबईकरांनादेखील यंदा या गुजराती साखरेच्या हारावर आपला गुढी उभारावा लागणार आहे. पाडव्यासाठी झेंडू फुलांनादेखील मोठे महत्व असल्याने बाजारात झेंडूदेखील मोठ्या प्रमाणात बाजारात येऊ लागला आहे. सध्या झेंडूला 40 ते 50 रुपये एवढा भाव मिळत असल्याने बळीराजाचा गुढी पाडवा चांगला होणार आहे. 


गुढीपाडवा 2022 :


नवीन हिंदू वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. याबरोबरच चैत्र नवरात्री आणि गुढीपाडवा हा सण या दिवशी साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो.  त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा महत्त्वाचा शुभ मानला जातो.  गुढीपाडव्याला पछडी, उगादी आणि संवत्सरा पाडो असेही म्हणतात. 


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha