मुंबई : मागील वर्षात तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईनंतर सध्या बीड, औरंगाबाद, मालेगाव आणि परभणी हे जिल्हे पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान या दहशतवादी (Terrorism) संघटना वेगवेगळ्या जिल्ह्यातून कार्यरत असल्याची माहिती देखील आता समोर येत आहे. त्यामुळे देशातील तसेच राज्यातील सुरक्षा यंत्रणांवर सध्या प्रश्न उपस्थित केला जात आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चेत आला तो म्हणजे राज्यातील बीड जिल्हा. कारण बीडमध्ये (Beed) राहणारा झैबुद्दीन अन्सारी ही तपास यंत्रणांच्या रडावर होता. त्याची बॉम्बस्फोट आणि 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणातही चौकशी करण्यात आली होती. 


बीडमध्ये दहशतवादी संघटनांचं वाढतं नेटवर्क


राज्यात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआयवर एनआयए आणि एटीएसने अनेक छापे टाकले. बेकायदेशीर स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचा (सिमी) माजी सदस्य जैनुद्दीन याने बीड, मालेगाव, औरंगाबाद आणि परभणी या सिमीच्या बालेकिल्ल्यांमधील दहशतवाद्यांचे नेटवर्कही मजबूत करण्यास सुरुवात केली होती, असा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यामध्ये मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणावर असल्याने दहशतवाद्यांना लोकांपर्यंत सहज पोहोचता येते असं देखील तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.


बीड जिल्हा हा डोंगर आणि खाणकामाचे केंद्र आहे. काही ठिकाणी खाणकामासाठी स्फोटकांचा वापर केला जातो. त्यामुळे येथे स्फोटके देखील सहज उपलब्ध होऊ शकतात. दरम्यान दहशतवादी संघटना प्रशिक्षण, बॉम्ब चाचणी आणि इतर प्रशिक्षणासाठी या ठिकाणाचा वापर करणे दहशतवादी संघटनांना सोयीस्कर होते. 


तपास यंत्रणांची छापेमारी


एनआयए आणि एटीएसने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं होतं. यामध्ये औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये तपास यंत्रणांकडून छापेमारी करण्यात आली होती. रविवार (13 ऑगस्ट) रोजी एनआयएकडून पीएफआयच्या प्रकरणात विविध राज्यांमध्ये छापेमारी करुन गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आलं आहे. 


पीएफआयच्याविरोधात राज्यांमध्ये 14 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. एनआयएने पाच राज्यांच्या 14 जिल्ह्यांतील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघेटनेशी संबंधित छापेमारी केल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील दहशतवादी मोड्युल उघडकीस आलं आहे. दरम्यान तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटनांकडून सध्या एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी मोबाईल आणि लॅपटॉपसारख्या साधनांचा वापर केला जात आहे. त्यामुळे तपासामध्ये ही साधनं मोठ्या प्रमाणात सापडत असल्याचं देखील समोर आलं आहे. 


हेही वाचा : 


Yavatmal Crime : दोन चिमुकल्यांना विष पाजून आईने स्वत: लाही संपवलं; उमरखेड हादरलं