सोमवारी बारावीचा गणित विषयाचा पेपर होता. मात्र प्रश्नपत्रिका 20 मिनिटं आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी झाली.
हॉल क्रमांक 9 मध्ये प्राध्यापक जाहेद अली सिद्दीकी पर्यवेक्षक म्हणून काम करत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना बाहेरुन कॉपी आणण्यास मनाई केली, त्याचप्रमाणे वर्गातही कॉपी करु दिली नाही.
या प्रकारामुळे तरुणांचं टोळकं संतप्त झालं होतं. सिद्दीकी उत्तरपत्रिका जमा करुन महाविद्यालयाच्या वऱ्हांड्यात उभे असतानाच टोळक्यानं त्यांना जबर मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. सिद्दीकी यांनी संबंधित विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
आसाराम सानप, बालाजी काळूसे, रणजीत कांबळे, अक्षय जावळे, विशाल अड़ागळे, अंगद काळूसे, प्रविण गर्जे, विशाल काळूसे, अक्षय जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिस उपनिरीक्षक दहीफळे अधिक तपास करत आहेत.