दहावीचा अभ्यास जेमतेम दीड महिन्यात केला : रिंकू राजगुरु

Continues below advertisement
सोलापूर : सैराट चित्रपटामुळे घराघरात पोहचलेली आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरु यावर्षी दहावीची परीक्षा देत आहे. चित्रपटाच्या शूटिंगनंतर दीड महिन्यांच्या कालावधीत अभ्यास केल्याचं रिंकूने सांगितलं आहे. वर्षभराच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच पेपर देत आहे. शूटिंग संपल्यानंतर अभ्यासाठी जेमतेम दीड-दोन महिन्यांचा वेळ मिळाला, त्यात होईल तितका अभ्यास केला, असं रिंकू म्हणाली. रिंकूच्या दहावीचा पहिला पेपर मंगळवारी असून त्यानिमित्ताने मैत्रिणींना भेटता येण्याचा आनंदही तिला आहे. सैराटचं शूटिंग आणि नंतर त्याचा कानडी रिमेक झाल्यामुळे अभ्यासापासून रिंकू काहीशी दुरावली. मात्र लाईट-कॅमेरा-अॅक्शन ते फिजिक्स-केमिस्ट्री हा प्रवास अवघड नसल्याचं रिंकू सांगते. अभ्यास करायची आवड आहे, त्यामुळे करायला लागला की करते. अभ्यासाच्या वेळी अभ्यास आणि अभिनयाच्या वेळी अभिनय, याबाबत रिंकू ठाम आहे. दीड महिन्याचा कालावधी असला तरी अभ्यासात खंड पडल्यामुळे पुन्हा जुळवून घेणं जरा अवघड गेलं, मात्र शक्य तितका अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं रिंकूने स्पष्ट केलं. कुठल्या विषयाची भीती आहे, अशातला भाग नाही, मात्र एकदम निर्धास्त आहे, असंही म्हणता येणार नाही, कारण सगळ्याचा थोडा थोडा अभ्यास झाला आहे, असं रिंकू मिश्किलपणे म्हणते. रिंकू दोन वर्ष शाळा, अभ्यास या प्रवाहापासून दूर राहिल्यामुळे तिला जसं सोयीचं वाटेल, तसा तिने अभ्यास करावा, अशी मुभा तिला दिल्याचं रिंकूचे वडील सांगतात. तिला महाराष्ट्राच्या जनतेने आशिर्वाद द्यावेत, असं आवाहन करतानाच तिच्या प्रयत्नांना यश मिळणारच अशी खात्रीही वडिलांनी व्यक्त केली.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola