मॉस्को (रशिया) : महाराष्ट्रातील 360 एक्सप्लोरर या ग्रुपने एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रुसच्या बेसकॅम्पवर तिरंगा फडकावला आहे. भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त युरोपमधील सर्वोच्च शिखरावर हे सह्याद्रीचे मावळे 73 फुटी तिरंगा फडकावणार आहेत.

360 एक्सप्लोरर या ग्रुपमार्फत 15 ऑगस्ट रोजी युरोपातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकावण्याची मोहीम आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 10 वर्षाच्या साई कवडे या मुलाचा देखील समावेश आहे.  साई हा एलब्रूस शिखर सर करणारा आशियातील सर्वात लहान मुलगा ठरणार आहे. उद्या 15 ऑगस्ट रोजी अंतिम चढाईला निघण्यापूर्वी आनंद बनसोडे, साई कवडे, कोल्हापूरचा सागर नलावडे, औरंगाबादचा भूषण वेताळ, साताऱ्याचा तुषार पवार यांनी 73 फुटी तिरंगा एलब्रूस बेसकॅम्प (13000 फूट उंचीवर) येथे फडकावून विदेशात सर्वात लांब तिरंगा फडकवण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. याची नोंद वेगवेगळ्या रेकॉर्डबुक मध्ये होणार आहे, असे 360 एक्सप्लोररचे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी सांगितले.

आनंद बनसोडे यांनी जुलै 2014 मध्ये हे शिखर सर केले होते. त्यानंतर आनंद आता या टीमला मार्गदर्शक म्हणून पुन्हा या मोहिमेवर आले आहेत. एलब्रूस मोहिमेनंतर 360 एक्सप्लोररची टीम भारतात येऊन लगेच कोल्हापूर सांगली येथे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जाणार आहे. कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्त लोकांना या संकटातून सावरण्याची प्रेरणा देण्यासाठी युरोपातील सर्वोच्च शिखराच्या बेसकॅम्पवर खास कोल्हापुरी फेटा बांधून या टीमने तिरंग्याला अभिवादन केले.