मुंबई : विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असताना एकीकडे राजकीय यात्रा सुरू झाल्या तर दुसरीकडे निवडणुकीसाठी पडद्या मागच्या हालचाली ही सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी सुरू झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्याही बैठका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 'काँग्रेसची ऑफर आणि वंचितचा नकार' हाच कित्ता विधानसभेच्या निमित्तानं पुन्हा एकदा गिरवला जात असल्याचं बोललं जात आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, परवा रात्री प्रकाश आंबेडकरांच्या मुंबईच्या निवासस्थानी एक बैठक झाली. कॉंग्रेसकडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या काँग्रेस नेत्यांनी वंचितला येत्या विधानसभेत 96 जागा देऊ केल्याचे समजते. मात्र वंचितला हे मान्य नसल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांपैकी वंचितला 96 जागा देऊन काँग्रेस 96 आणि राष्ट्रवादी 96 जागांवर निवडणूक लढवेल, असा फॉर्म्युला या नेत्यांनी आंबेडकरांसमोर ठेवल्याचे समजते. परंतू वंचितला ज्या 96 जागा देऊ केल्या आहेत त्या तिसरी आघाडी म्हणून दिल्या जातील, अशी काँग्रेसची भूमिका असून त्यात वंचितला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इतर मित्र पक्षाच्या उमेदवारांनाही सामावून घ्यावे लागणार आहे. मात्र हे प्रकाश आंबेडकरांना मान्य नसल्याचे समजते.

'काँग्रेस नेत्यांची ही ऑफर अमान्य करत आंबेडकरांनी वंचितसाठी पूर्ण 96 जागा मागितल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या मित्र पक्षांना आपापल्या 96 जागांमध्ये सामावून घ्यावे', अशी त्यांची भूमिका असल्याचे समजते.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितला फार यश मिळालं नसलं तरी आघाडी न झाल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पाडून भाजपला यश मिळवून देण्यात नक्कीच काही ठिकाणी वंचितची मदत झाली. त्यामुळे चिडलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वंचितला भाजपाची बी टीम म्हणत नावे ठेवली असली तरी परत एकदा अवघ्या दोन महिन्यांत हे ही विसरून पुन्हा विधानसभेसाठी वाटाघाटीला सुरुवात करण्यात आली आहे.

विधानसभेचे वारे वाहू लागल्यापासून बरीच मंडळी काँग्रेस राष्ट्रवादी सोडून भाजप-सेनेत जाऊ बघते आहे. बरीच नेते मंडळी ही आपल्याला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळू शकते का? हे ही प्रामुख्याने तपासत आहेत. मात्र यावेळीही प्रकाश आंबेडकर वाटाघाटींसाठी न थांबता आपली उमेदवार यादी घोषित करणार असल्याचे समजते आहे. आता हे दबाव तंत्र आहे की सत्यता? हे येत्या काळात समजेलच.