जळगाव: लग्नकार्य म्हटलं की मानापमान आलाच. त्यात तुमची बाजू नवरी मुलीची असेल तर विचारायलाच नको. मात्र, जळगावात एका मुलीच्या वडिलानं वऱ्हाडींचं अजबच स्वागत केलं. ज्याची चर्चा सध्या सगळीकडेच सुरु आहे.
जळगावची एक तरुणी उत्तर प्रदेशातल्या एका तरुणासोबत लग्नाच्या बेडीत अडकली. वऱ्हाड उत्तर प्रदेशातनं जळगावात आलं आणि शाल, टोपी, नारळ अशा मानपानाऐवजी गोमुत्र आणि गायीच्या शेणानं त्याचं स्वागत झालं.
साहजिक, या अजब स्वागतानं वऱ्हाडी मंडळी दचकली. मात्र, वधूच्या वडिलांनी या स्वागतामागचं कारणही स्पष्ट केलं.
गाईच्या शेणात, दूध, तूप, मध आणि काळ्या मातीचं मिश्रण केलं गेलं. मग हळूहळू तब्बल 200 वऱ्हाडींनी या गोबर स्नानाचा आनंद लुटला. त्यात पाऊस सुरु झाला आणि सोबतीला सैराटचं झिंगाट गाणंही.
गोमुत्राचं, शेणाचं आयुर्वेदातलं महत्व कुणीही नाकारत नाही. मग मानापमानाच्या बुरसट परंपरेपेक्षा, आरोग्य सदृढ करणारा हा गोबर स्नानाचा मान कुणी का राखू नये?