धुळे : धुळे तालुक्यात ग्रामसेवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. गोंदूर ग्रामपंचायतीतील 50 वर्षीय ग्रामसेवक संजय वाघ यांनी ग्रामपंचायतीच्या शौचालयात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. काल संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घटना घडली.
ग्रामसवेकाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर देवपूर पश्चिम पोलिसांनी गोंदूर ग्रामपंचायतीचं कार्यालय सील केलं आहे. कामाच्या अति ताणामुळे ग्रामसेवक संजय वाघ यांनी आत्महत्या केल्याचा आरोप ग्रामसेवक संघटनेने केला आहे.
कामाच्या अति ताणामुळे संजय भालेराव वाघ या ग्रामसेवकाने आत्महत्या केल्याचा आरोप करत, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन ग्रामसेवक संघटनेनं सुरु केलं आहे. ग्रामसेवक संजय वाघ यांच्या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून देवपूर पश्चिम पोलिसांनी केली आहे.
मृत ग्रामसेवक संजय भालेराव वाघ यांची सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र आत्महत्येमागचं नेमकं कारण पोलिसांनी देखील सांगितलं नाही. त्या चिठ्ठीत सहा जणांची नांव असल्याची चर्चा आहे. ते सहा जण कोण? याविषयी चर्चेला उधाण आलं आहे.