सातारा : लाखो पर्यटकांचं आकर्षण ठरणारं साताऱ्यातील कास पठार आता बेचिराख होताना दिसतं आहे. कास पठारावर ज्या भागात फुलांचा सडा पहायला मिळतो. त्याच ठिकाणी वणवे लागले आहेत.


महाराष्ट्राचा पुष्पमुकुट अशी कास पठाराची ओळख आहे. असंख्य रंगांची दुनिया... पण हीच दुनिया आता बेचिराख होण्याच्या मार्गावर आहे. कारण युनेस्कोच्या हेरिटेज साईटला वणवा लावण्यात आला आहे

होय, तुमचं आवडतं कास पठार जळून खाक होण्याच्या मार्गावर आहे. याचं एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे स्थानिक गुराख्यांची अंधश्रद्धा.

यंदा वणवा लावला तर पुढच्या मौसमात जनावरांना म्हणे चारा चांगला मिळतो. पण काही गुराखी मात्र पर्यटकांकडे बोट दाखवतात.

अगदी पठाराला लागूनच काही जणांनी शेकोटी केल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे हे काम निसर्गाचं नाही तर माणसाचंच आहे. पण अख्खं पठार धोक्यात येईपर्यंत इथं असलेले वनखातं काय करत होतं असाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतो?

या वणव्यानं फक्त वनस्पतीच नाही तर पशुपक्ष्यांनाही मोठा धोका निर्माण होतो. निसर्गानं कोणत्याही मोबदल्याविना आपल्याला हा अमूल्य ठेवा दिला आहे. त्याची अपेक्षा इतकीच आहे. अंधश्रद्धेच्या किंवा उन्मादाच्या आगीत हा ठेवा भस्मसात करु नका.

VIDEO :