अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं गाव असलेलं अहमदनगरमधील राळेगणसिद्धी आणि आदर्श गाव हिवरेबाजार देशभरात प्रसिद्ध आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ही दोन्ही गावं पुन्हा चर्चेत आली आहेत. या दोन्ही गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक पार पडणार आहेत. कारण ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात दोन्ही गावांना अपयश आलं आहे.


राळेगण सिद्धी गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात अपयश आले आहे. राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीतील 9 पैकी फक्त 2 जागा बिनविरोध होणार आहेत. तर 7 जागेवर निवडणूक होणार आहे. 1975 साली अण्णा हजारे हे राळेगण सिद्धी गावामध्ये आले. त्यानंतर सलग 35 वर्षे गावामध्ये बिनविरोध निवडणूक झाली. गेल्या वेळी गावात पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक झाली तर यावेळी देखील बोनविरोध घोषणा होऊनही निवडणूक होणार आहे. गेल्या 45 वर्षात दुसऱ्यांदा राळेगण मध्ये ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करा आणि 25 लाख निधी घ्या असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वात प्रथम राळेगण सिद्धी गावाने बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन बिनविरोध घेण्याचा निर्णय झाला होता मात्र तो अपयशी ठरला आहे.


आदर्शगाव हिवरे बाजार गावामध्ये बिनविरोध निवडणुकीला अपयश आले आहे. पहिल्यांदाच हिवरे बाजारमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. सर्व जागांवर निवडणूक पार पडणार आहे. हिवरे बाजार मध्ये एकूण 7 जागा आहेत त्या 7 जागांवर ही निवडणूक होणार आहे. दरवेळी या गावात बिनविरोध सरपंच निवड होत होती. 1990 पासून 30 वर्षात पहिल्यांदा गावात निवडणूक होत आहे. गेल्यावर्षी आरक्षण असल्याने पोपट पवार उप-सरपंच होते. 1958 साली गावाची स्थापना झाली, त्यानंतर 1985 साली निवडणूक झाली. मात्र पोपट पवार सरपंच झाल्यानंतर 30 वर्षात पहिल्यांदा गावात निवडणूक होत आहे.


Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याची धडपड, निधीचं अमिष कितपत योग्य?