Gram Panchayat : ग्रामपंचायत (Gram Panchayat) हे ग्रामीण भागातील विकास आणि सामाजिक सुरक्षेचं मुख्य केंद्र असते. हा गावगाडा पुढे नेण्याचं काम गावचा सरपंच करत असतो. मात्र, ग्रामपंचायतीचा कारभार करत असताना त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी सोडवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून अखिल भारतीय संरपंच परिषद शासन दरबारी लढा देत आहे. मात्र, सरकारचं ग्रामपंचायतीच्या संदर्भातील विविध मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं विविध मागण्यांसाठी येत्या 16 ऑगस्टपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन होणार आहे. 


या कामबंद आंदोलनात सरपंच (Sarpanch), उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांचा समावेश आहे. 28 ऑगस्टपर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय संरपंच परिषदचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली.  पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे. 


नेमक्या काय आहेत मागण्या?



  • सरपंचांना 15 हजार रुपये, उपसरपंचाला 10 हजार रुपये तर ग्रामपंचायत सदस्याला 3 हजार रुपयांचे मानध मिळावे

  • ग्रामपंचायत संदर्भातील सर्व घटकांना विमा, पेन्शन, निश्चित वेतन लागू करावे

  • मुंबईत सरपंच भवनची स्थापना करावी

  • ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित करुन पंचायत विकास अधिकारी म्हणावे

  • ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक पूर्णवेळ करुन वेतनिश्चिती करावी

  • संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधात आणावे

  • यावलकर समितीचा अहवाल लागू करावा

  • संगणक परिचालकांचा भार ग्रामपंचायतीऐवजी शासनाने उचलावा

  • ग्रामपंचायतींना स्वायत्त संस्थेचा अधिकार देऊन विकासकामे करण्याचा अधिकार द्यावा


कामबंद आंदोलनाचा परिणाम काय होणार?


राज्यात 28 हजार ग्रामपंचायती आहेत. एकाच वेळी ग्रामपंचायतींचा कारभार बंद झाल्यानं नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागणार आहे.


लाडकी बहिण योजना, पीक विमा अर्ज अशी कामं थांबणार
शैक्षणिक कागदपत्रे, दाखले मिळणार नाहीत
महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या योजनांचे काम होणार नाही
गावगाडा ठप्प होणार


अडीच ते तीन लाख लोक या आंदोलनात सहभागी होणार, जयंत पाटलांची माहिती


दरम्यान, जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अडीच ते तीन लाख लोक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळं राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प होणार आहे. सरकार, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करुन ग्रामी विकासाचा गळा घोटत असल्याचे जयंत पाटी म्हणाले. 


आमच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष : राजेंद्र पाटील


ग्रामपंयातीसंदर्भात अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या मागण्या योग्य असल्याचे मत माढा तालुक्यातील केवड गावचे सरपंच प्रतिनिधी राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. सध्या गावगाडा हाकताना सरपंच, उपसरपंच, ग्रामसेव , कर्मचारी यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार आम्ही मागणी करुन देखील, आमच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं हे कामबंद आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं त्वरीत आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे असे राजेंद्र पाटील म्हणाले. जयंत पाटील यांनी घोषणा केल्याप्रमाणे केवड ग्रामपंचायत देखील कामबंद आंदोलन करणार आहे. तसेच 28 ऑगस्टपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आझाद मैदानात आम्ही एल्गार करणार असल्याचे राजेंद्र पाटील यांनी सांगितले.


महत्वाच्या बातम्या:


राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विधानभवनवर आक्रोश मोर्चा, काय आहेत मागण्या?