Bhandara News भंडारा : भंडाऱ्यातील ग्रामपंचायत कार्यालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  भंडाऱ्यातील (Bhandara News) ग्राम सुरक्षा दलाची जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्यानं थेट ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवाच्या टेबलवरचं बसून मद्यप्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ या ग्रामपंचायतीमधील हा संपूर्ण प्रकार आहे. तर या घटनेचा संपूर्ण प्रकार गावातीलच एका व्यक्तीनं त्याच्या मोबाईलमध्ये कैद केलाय. हा व्हिडिओ आता समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


चक्क सरपंच, सचिवाच्या टेबलवर बसूनच मद्यप्राशन


प्रशांत मन्साराम शेंडे (वय 25) असं मद्यप्राशन करीत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं नाव आहे. हा कंत्राटी कर्मचारी ऑगस्ट 2023 पासून या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहे. माझं कोण काय बिघडवतय, असं म्हणत हा कंत्राटी कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयात बसूनच सरपंच सचिवाच्या टेबलवर मद्यप्राशन करीत असल्याचा हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ मागील आठवड्यातला असल्याचंही बोलल्या जात आहे. ग्रामपंचायत प्रशासन या मद्यपी कर्मचाऱ्यावर आता काय कारवाई करतंय? याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


ढोल वाजवत आरटीओ वाहतूक निरीक्षकाच्या खुर्चीला हार घालून निषेध


भंडारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (RTO) वाहतूक निरीक्षक जाधव हे आठवड्यातून केवळ तीन दिवस कार्यालयात उपस्थित राहतात. त्यामुळं नवीन गाड्यांच्या पासींग असो किंवा आरटीओ कार्यालयातून मिळणारे महत्वाचे कागदपत्र हे दीड महिन्यांपर्यंत मिळत नाही. यासाठी वाहन चालक मालकांना अनेकदा आरटीओ ऑफिसमध्ये चकरा माराव्या लागत असल्याचा आरोप करून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. यात भंडारा उपप्रदेशिक परिवहन कार्यालयात ढोल वाजवून  वाहतूक निरीक्षकांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत, अभिनव पद्धतीनं आंदोलन करून निषेध नोंदविला.


चोरी करण्याच्या उद्देशानं गावात शिरलेल्या दोघांना बदडलं!


चोरी करण्याच्या उद्देशानं मध्यप्रदेशातील बालाघाट येथील दोन चोरटे मध्यरात्री दुचाकीनं महाराष्ट्रातील देवसर्रा या गावात पोहोचले होते. सुरेंद्र बघेल यांच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशानं दोघेही घरात शिरले होते. घरातील व्यक्तींना जाग आल्यानं हा चोरीचा प्रकार उघड झाला. त्यानंतर घरातील व्यक्तींनी आरडाओरड केल्यानं शेजाऱ्यांनी त्यांच्या घरी धाव घेत, या दोन्ही चोरट्यांना चोरीच्या साहित्यासह रंगेहात पकडलं.


ग्रामस्थांनी दोघांनाही विचारणा केली असता त्यांनी उडवाडीचं उत्तर दिल्यानं ग्रामस्थांनी त्यांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर या दोघांना दोरखंडांनी बांधून ठेवत सिहोरा पोलिसांना याची माहिती दिली. सिहोरा पोलिसांनी चोरीसाठी वापरलेली दुचाकी आणि चोरीच्या साहित्यासह दोघांनाही ताब्यात घेतलं. त्यांच्यावर सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सध्या सुरू आहे.


हे ही वाचा