मुंबई : काँग्रेस पक्षाने आतापर्यंत 598 ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे तर 132 ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवत एकूण 721 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीने एकूण 1312 ग्रामपंचायतीत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे. भाजपने केलेले दावे साफ खोटे असून हिंमत असेल तर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. त्यावर भाजपनेही उत्तर दिलं आहे. नाना पटोले यांना खोटं बोलायची सवयच झाली असून त्यांनी समोरासमोर यावं आणि पुरावे दाखवावेत असं भाजपचे प्रवक्ते प्रवीण दरेकर यांनी आव्हान दिलं. 


टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुक निकालाबद्दल भारतीय जनता पक्षाने केलेला दावा हा खोटा व हास्यास्पद आहे. मुळात या निवडणुका चिन्हावर लढल्या जात नाहीत, त्यांनी दिलेले आकडे हे खोटे आहेत, त्यांनी ग्रामपंचातींच्या नावासह यादी जाहीर करावी मग कळेल जनतेने कोणाच्या बाजूने निकाल दिला आहे. मागील वर्षी झालेल्या बाजार समिती निवडणुकीतही भाजपाने असाच खोटा दावा केला होता वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. राज्यातील बहुतांश बाजार समित्यांवर काँग्रेस व मित्रपक्षांचाच विजय झालेला आहे. 


नाना पटोले म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीतही राज्यातील जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे पण ‘खोटे बोल पण रेटून बोल’ अशा पद्धतीने ते विजयाचा खोटा दावा करत आहेत. नागपूर जिल्ह्यातही भाजपाचा सुपडासाफ झालेला आहे, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील आतापर्यंत 23 ग्रामपंचयातीवर काँग्रेसने दणदणित विजय मिळवला असून भाजपाच्या वाट्याला फक्त 2 ग्रामपंचायती आल्या आहेत तरीही ते स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत. 


ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका, देवेंद्र फडणवीस जबाबदार


ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नव्हते, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढाव्या लागल्या. त्याला भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. फडणवीस व भाजपामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. सत्तेवर आलो तर 24 तासात ओबीसी समाजाचे आरक्षण देण्याची वल्गना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पण दीड वर्षात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण दिले नाही याचे उत्तरही जनतेने भाजपाला दिले आहे. राज्यातील जनतेने भाजपाचा खोटारडा चेहरा उघडा पाडला आहे. महाराष्ट्रात सर्वच भागात काँग्रेसचा प्रभाव आहे.


अजित पवार महायुतीत आल्याने फायदा झाल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, महायुतीला जर फायदा झाला असेल तर मग विधानसभा बरखास्त करुन निवडणुका घेण्याची हिंमत का दाखवत नाहीत. तीन तिघाडा आणि काम बिघाडी, अशी त्यांची अवस्था आहे. चिन्हावरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास ते का घाबरता आहेत?


भाजपचे उत्तर


नाना पटोले यांच्या दाव्यानंतर त्याला भाजनेही उत्तर दिलं आहे. राज्यात भाजपकडे आतापर्यंत 600 हून अधिक ग्रामपंचायती आल्या असून महायुकीकडे 1200 हून जास्त ग्रामपंचायची आल्या आहेत. त्यामुळे नाना पटोले कशाचा आधारावर दावा करता अशा प्रश्न भाजपचे प्रवक्ते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. नाना पटोले यांना खोटं बोलयची सवय असून त्यांनी समोरासमोर येऊन ते सिद्ध करावं असं आव्हानही त्यांनी दिलं. 


ही बातमी वाचा: