Maharashtra Gram Panchayat Elections 2021 :  राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये ग्रामपंचायतींसाठी निवडणुका पार पडल्या. काही अपवाद वगळता राज्यभर शांततेत मतदान पार पडले. आता लक्ष लागले आहे ते 18 जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीकडे. आज मतदान शांततेत पार पडले असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लाखो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. काही ठिकाणी ईव्हिएम मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या काही वेळ रांगा लागल्याचं दिसून आलं. मात्र प्रशासनानं तात्काळ त्यावर उपाययोजन करत प्रक्रिया सुरळीत केली.


ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंच सोडत जाहीर होणार, 8 जिल्ह्यांतील आरक्षण सोडतही रद्द


राज्यात 34 जिल्ह्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली. यातील काही गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु, कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे.


Maharashtra Gram Panchayat Elections 2021 LIVE Updates: ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा!






गडचिरोलीत जवळपास 80 टक्के मतदान

गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदान प्रक्रिया संपन्न, गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त असल्याने सकाळी 7 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत  मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. मतदान प्रक्रिया सकाळी 7 वाजेपासून 1.30 वाजेपर्यंत 70.16 टक्के इतकं मतदान झालं असून अंतिम टक्केवारी 80 टक्के इतकं होण्याची शक्यता आहे.




कोरोनाबाधित रुग्णांना मतदानाची विशेष सुविधा


कोरोनाबाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती; तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांनी मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धातास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान केलं.


कोल्हापुरात अंधश्रद्धेच्या नावावर लोकशाहीचा बाजार, शपथा घेऊन मतदान करण्यास दबाव


निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या


ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362.


भिवंडी, सोलापुरातील गावात राडा


भिवंडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान झालं. आज सोनाळे गावात काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा पाहण्यास मिळाला. दोन गटात आधी बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. या धुमश्चक्रीत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली. यामध्ये काँग्रेसचे विजय पाटील आणि शिवसेनेचे लैलास पाटील यांच्यामध्ये चांगलाच राडा झाला.  या घटनेत दोन ते तीन जण जखमी झाल्याचे समजते. जखमी तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील तळे हिप्परगा तालुका उत्तर सोलापूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवेळी भोसले-भिंगारे गटात वाद झाला. वादातून मतदान केंद्राच्या जवळ दगडफेक झाली. दोन्ही गटाचे तीन ते चार कार्यकर्ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दौंड तालुक्यामधील कुसेगाव या ठिकाणी दोन गटात हमरीतुमरी झाली. गावात शांततेत मतदान सुरू असताना अचानक दोन गटात वाद सुरू झाला.


काही ठिकाणी प्रशासनाचा सावळा गोंधळ


धुळे तालुक्यातील कावठी या मतदान केंद्रावर एक तासाभर मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.  नांदगाव तालुक्यात प्रशासनाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला. वंजारवाडी  व  कऱ्ही मतदान केंद्रावर साडेतीन तास ईव्हीएम मशीन बंद होते. तर मनमाडच्या पानेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनवरुन उमेदवारांचे नावच गायब होते.