मुंबई : सातारा जिल्ह्यातल्या मायणीमधील मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या 95 विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे.  राज्य सरकार मेडीकल कौन्सिलला पत्र पाठवून या विद्यार्थ्यांना इतर कॉलेजमध्ये प्रवेश मिळवूण देण्याची विनंती करणार आहे.


विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या प्रश्नाबाबत लक्षवेधी सूचना मांडली. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती माणिकराव ठाकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, सभागृह नेते चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार जयंत पाटील, निरंजन डावखरे यांच्या बैठकीत हा तोडगा काढण्यात आला.

काय आहे प्रकरण?

मायणी येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या प्रवेशावेळी खोटी माहिती देऊन 95 विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली. त्यामुळे 2014-15 साली प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची तीन शैक्षणिक वर्षे वाया जाण्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवल्याने मुंबईच्या आझाद मैदानात हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत.