बीड : सरकारनं मराठा आरक्षणासाठी 7 ऑगस्टपर्यंत योग्य निर्णय घ्यावा. आरक्षणासंबंधी लेखी आश्वासन द्यावं. अन्यथा 9 ऑगस्टला राज्यभरात मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा परळीतील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी दिला आहे. त्याचबरोबर आंदोलनावेळी ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना सरकारनं योग्य मदत द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.


आज मराठा क्रांती मोर्चाची बैठक परळीत पार पडली. गेल्या 16 दिवसांपासून परळीत ठिय्या आंदोलन सुरु आहे. लेखी आश्वासनाशिवाय हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.


सरकार जर इतर ठिकाणच्या मराठा कार्यकर्त्यांशी चर्चा करत असेल, तर आम्हास ते मान्य होणार नाही. जी चर्चा करायची आहे, ती येथूनच होईल, असे स्पष्ट मत परळी येथील मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी मांडलं होतं.


काय आहेत मागण्या?


1. राज्य सरकार करत असलेल्या मेगा भरती स्थगित करावी. मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय भरती करु नये.
2. अशा प्रकारचे आश्वासन सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी लेखी द्यावे.
3. कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यात यावी.


मान्यवरांची बैठक संपली, आरक्षणासाठी कटिबद्ध: मुख्यमंत्री


मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांनी आज विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक बोलावली होती. मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.


या बैठकीत मराठा समाजाच्या लघु आणि दीर्घ उपाययोजनावर चर्चा झाली. आंदोलनात हिंसा होऊ नये यासाठी दोन्ही बाजूनी आवाहन करण्यात आलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.


“या बैठकीसाठी 20 ते 22 मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म उपाययोजना यावर चर्चा झाली. संयुक्त निवेदनाद्वारे म्हणणं मांडण्यात येणार आहे. मान्यवरांनी मोलाच्या सूचना दिल्या. तर आम्ही सरकारच्या योजना त्यांना सांगितल्या. निवदेनाद्वारे शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहोत. कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आंदोलनात हिंसा होऊ नये यासाठी आवाहन करण्यात आलं”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


या बैठकीला ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह.साळुंखे, उद्योजक बी.बी.ठोंबरे, अभिनेते सयाजी शिंदे, इतिहासकार पांडुरंग बलकवडे, अभिनेते अमोल कोल्हे यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.


मराठा आंदोलनांची कोंडी फुटावी आणि चर्चेतनं मार्ग निघावा या हेतूनं ही बैठक बोलावण्यात आली होती.


“सर्व विचारवंतांसोबत चर्चा केली, सूचनांच्या नोंदी घेतल्या. मराठा आंदोलन सुरु आहे, त्याबाबत विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत बैठक घेतली. या बैठकीत समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी चर्चा झाली. मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळावं याबाबत चर्चा झाली. आंदोलनात हिंसा होऊ नये, आत्महत्या होऊ नये याबाबत आवाहन करण्यात आलं” अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.