उल्हासनगर : उल्हासनगरमधील लालचक्की इथल्या शिवसेनेच्या दहीहंडी सहाव्या थरावरुन पडल्याने 11 वर्षीय गोविंदा गंभीर जखमी झाला आहे. राधेश्याम गोविंदा पथकातील या गोविंदावर कल्याणमधील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


 

उल्हासनगरमधील लालचक्की इथली दहीहंडी फोडताना सुजल गडपकार हा 11 वर्षांचा गोविंदा सहाव्या थरावरुन पडला. सुजलच्या डोक्याला आणि छातीला मार लागल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. त्याला आधी शिवनेरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. नंतर त्याला कल्याणच्या फोर्टिसला हलवलं. सध्या तो कोमात असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

 

दरम्यान, या घटनेनंतर शिवसेनेचे उल्हासनगरचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी फोर्टिस रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदाची विचारपूस केली. तसंच सुजल गडपकारचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शिवसेना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने 20 फुटांपेक्षा अधिक उंची आणि 18 वर्षांखालील गोविंदांना दहीहंडीत बंदी घातली असतानाही मुंबईत अनेक ठिकाणी या नियमाचं उल्लंघन होत आहे. न्यायालयाच्या आदेश अक्षरश: पायदळी तुडवला जात आहे.