Governor Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या घटनेला अनेक दिवस उलटलेत. विरोधी पक्षानं राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलनेही केलं. विरोधी पक्षासह भाजपमधील काही नेत्यांनी राज्यपालांच्या उचलबांगडीची मागणी केली आहे. भाजप खासदार उदयनराजे यांनी तर मी हतबल झालो अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिलीय. पण केंद्रीय नेतृत्व गुजरातच्या निवडणुकीत व्यस्त असल्यानं आठ डिसेंबरनंतरच राज्यपालांचं काय होणार हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
 
राज्यपालांच्या वक्तव्यानंतरही कारवाईचा ‘क’ ही उच्चारला जात नसल्यानं उदयनराजेंनी शिवसन्मान कार्यक्रम हाती घेतला आहे. ते समर्थकांसह रायगडाकडे निघालेत. उद्या ते आपली वेदना रायगडावर व्यक्त करणार आहेत. राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीनं आंदोलनं केली. उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणातून राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं होतं. भाजप नेत्यांनी समर्थनाचा प्रयत्न केला, पण लोकभावना लक्षात घेऊन त्यांनीही यू टर्न घेतला. आता छत्रपतींचे वंशज आक्रमक भूमिकेत असल्यानं विरोधकांना राज्यपालांवरील कारवाईचं श्रेय किती मिळेल याबाबत शंका आहे.


राज्यपालांनी आक्षेपार्ह वक्तव्य करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी महात्मा फुलेंबद्दल त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर छत्रपतींबद्दल बोलताना ते घसरले.
त्यामुळे महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमानाची भावना ठळक झाली.ज्याचा निकाल गुजरात निवडणुकीसोबतच लागेल अशी अटकळ बांधली जातेय.


छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल नेमके काय म्हटले होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाषणात वादग्रस्त वक्तव्य केले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले होते की, 'आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कुणाला सुभाषचंद्र भोस, कुणाला महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू आवडायचे. त्यामुळे मला असे वाटते की, तुम्हाला जर कोणी विचारले तुमचे आवडत हिरो कोण आहेत. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातचं ते सापडून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. नितीन गडकरीपर्यंत तुम्हाला हिरो इथेच भेटून जातील.'  


वादग्रस्त वक्तव्यांची मालिका -
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आधीदेखील अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबाबत राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यावेळी सर्वच स्तरातून  त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही वक्तव्य केले होते. त्यानंतर मुंबईतील एका चौकाचे उद्घाटन करताना कोश्यारी यांनी गुजराती आणि राजस्थानी समुदायामुळे मुंबईला महत्त्व मिळाल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर  राज्यपालांवर चहुबाजूने हल्लाबोल झाला होता. त्यानंतर राज्यपालांनी दिलगिरी व्यक्त केली होती.