मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना रविवारी चार दिवसांनंतर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांनंतर कोश्यारी यांचं राजभवन येथे आगमन झालं. राज्यपाल कोश्यारी यांना 22 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रिलायन्स रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता राज्यपाल कोरोनातून बरे झाल्यावर त्यांना रुग्णालायातून घरी सोडण्यात आलं आहे. यावेळी राज्यपालांनी ट्विट करत सर्व डॉक्टर, नर्स, रूग्णालयातील इतर कर्मचारी आणि अधिकारी यांचे आभार मानले आहेत.
राज्यपालांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'आज चार दिवसानंतर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. आता मी पूर्णपणे स्वस्थ आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक दोन दिवस विश्रांती घ्यावी लागेल. सर्व शुभचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानतो. एच.एन. रिलायन्स हॉस्पिटल येथे उपचार करणारे सर्व डॉक्टर्स यांचे वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनासाठी आभार मानतो. माझी काळजी घेणारे रिलायन्स हॉस्पिटल परिवारातील परिचारिका तसेच इतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी बंधु- भगिनी यांच्याप्रती मी ऋणनिर्देश व्यक्त करतो.'
महाराष्ट्रात राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. अशा स्थितीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अशातच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण झाली. पण राज्यपाल रुग्णालयात दाखल झाल्याने संभाव्य राजकीय घडामोडींबाबत अनेक प्रश्ननिर्माण झाले होते. दरम्यान राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्यानं पेचप्रसंगात अडचण होऊ नये म्हणून गोव्याच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा चार्ज देण्याची शक्यता असल्याची चर्चा होती. मात्र असं काहीही होणार नसल्याचं स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आलं आहे. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे उपलब्ध होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या