नवी दिल्ली : कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. देशात अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. याच संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनापासून वाचायचं असेल तर विलगीकरणावर अधिकाअधिक भर द्यावा असं आवाहन इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केलं आहे.


एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी, कोरोनावर औषधांसाठी जगभरात काय प्रयत्न सुरु आहेत, कोरोनावर तापमानाचा काही परिणाम होणार का, लॉकडाऊनचं टायमिंग योग्य आहे का? अशा अनेक प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली. डॉ. रमन गंगाखेडकर यांची सविस्तर मुलाखत रात्री 8 वाजता एबीपी माझावर पाहता येणार आहे.


एन 95 मास्क सामान्यांनी वापरण्याची गरज नाही : डॉ. रमण गंगाखेडकर


भारताची लोकसंख्या 135 कोटींच्या घरात आहे. एवढ्या मोठ्या देशात रोज शंभरने कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असेल तर ते किती भीतीदायक आहे हे तारतम्यानं विचार करुन ठरवा. भारतानं आपलं प्रत्येक पाऊल योग्येवेळी उचलेलं आहे. अजूनही कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झालेलं नाही. दोन चार केसेसमधून हा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. कारण अनेकदा या केसेसच्या नोंदणीत काही वेगळे घटक कारणीभूतही असू शकतात, असं डॉ. रमन गंगाखेडकर यांनी सांगितलं.


सरकारच्या प्रयत्न पाण्यात घालवू नका


कोरोनाचा सामना करण्यासाठी जी महत्त्वाची आणि कठोर पावलं उचलण्याची गरज होती, ते आपल्या सरकारने केलं आहे. महाराष्ट्र सरकारने तर एक दिवस आधीच लॉकडाऊन केलेलं होतं. महाराष्ट्र सरकारने घेतलेली अनेक पावलं इतर राज्यांच्या पुढची आहेत. मात्र लोकांनी लॉकडाऊनला खूप गंभीरतेने घेणे गरजेचं आहे. लॉकडाऊनला सहकार्य न करुन सरकारचे प्रयत्न पाण्यात घालवू नका असं आवाहन डॉ. गंगाखेडकर यांनी केलं आहे.


कोरोना व्हायरसवर लवकरच लस येणार; पुण्यात विषाणू शरीराबाहेर ठेवण्यात यश


कोरोनाची लागण झाली तरी अनेकांना कळणार नाही. 80 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली तरी त्याची लक्षणं न दिसता ते बरे होतील. लक्षणं दिसून बरे होणारे 15 टक्के आहेत, 5 टक्केच लोक त्यातून मृत्यूमुखी पडतात. त्यातही ज्यांना डायबिटीज, हायपरटेन्शन, हृदयाचे विकार आहेत, त्यांनी जास्त काळजी घेणे गरजेचं आहे. काळजी घेतली तर धोका टाळू शकता येऊ शकतो, असा सल्लाही डॉ. रमन गंगाखेडकर यांनी दिला.


कोरोनावर औषध शोधण्याचे जगभारातील संशोधकांचे प्रयत्न


जगाला हा आजार 31 डिसेंबरला कळाला. त्यानंतर आत्तापर्यंत जगभरात 100-150 डायग्नोसिस किट्स तयार झाले आहेत. जगभरात 30 ठिकाणच्या वॅक्सिन प्रगतीपथावर आहेत. कुठल्याही आजाराबाबत इतक्या वेगाने प्रगती आजवर झालेली नाही. अडीच महिन्यात जगभरातले शास्त्रज्ञ इतकं काम करत आहेत. भारतातही आम्ही हा व्हायरस बदलतो आहे का? लोकांना त्रास देणारी अजून काही लक्षणं दिसतायत का? यावर नजर ठेवून आहोत.


कोरोनावर उपाय म्हणून 'हायड्रॉक्सीक्लोरोक्विन' आपण वापरत नाही. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून हे औषध आपण वापरतोय. प्रत्येक व्यक्तीने खाण्यासारखं हे औषध नाही. या प्रत्येक औषधाचे काहीतरी साईड इफेक्टस असतात. जर हायड्रॉक्सिक्लोरोक्विन खाणाऱ्यांमध्ये काही सकारात्मक लक्षणं दिसली, तर आपण पुढे जाऊन काही ठाम सांगू शकतो. मात्र अद्याप ही स्टेज काही आलेली नाही. अशा केसेसमध्ये पूर्ण ट्रायलपर्यंत शास्त्रज्ञांना थांबता येत नाही, त्यामुळे असे छोटे छोटे सुरु असतात. अशी एखादी ट्रायल सुरु झाली म्हणजे उपचार मिळाला, असं होत नाही. लोकांनी ते खायला सुरु करून, आपण आता निर्धोक झालो असं समजू नये, असंही डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितलं.


एसीचा वापर टाळा यावर माझा विश्वास नाही


उष्णता वाढली की कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होईल, असं सांगितलं जातयं. याबाबत डॉ. गंगाखेडकर यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, तापमानाबाबत अजून कुठलाही निष्कर्ष काढता आलेला नाही. आपल्याला अजून हा व्हायरस अधिक तापमानात बघण्याची संधीच उपलबध झालेली नाही. एसीचा वापर टाळा यावर माझा विश्वास नाही. अशा गोष्टींपेक्षा विलगीकरणावर अधिक भर दयावा. दक्षिण कोरियात कोरोनावर मात करणं त्यांना का शक्य झालं? याची काही वेगळी वैयक्तिक मतं त्यांनी सांगितली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेला भारतावर विश्वास आहे, कारण अनेक लसी आपण याच्याआधीही शोधून दाखवल्या आहेत. याहीवेळी आपण पुढे आहोत, असं त्यांनी सांगितलं.


कोण आहेत डॉ. रमण गंगाखेडकर?


डॉ. रमण गंगाखेडकर हे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख आहेत. देशभरातल्या 14 संस्था त्यांच्या निगराणीत येतात. कोरोना संदर्भात जे लोक भारतात काम करत आहेत त्यापैकी एक डॉ. रमण गंगाखेडकर आहे.