मुंबई : शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करु असं म्हणत शेतीला आणि शेतकऱ्यांना अच्छे दिन आणण्याचं आश्वासन देणाऱ्या सरकाचे डोळे उघडणारं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने आज 2018 या वर्षातील शेतकरी आत्महत्यांचे आकडे जाहीर केले आहेत. या एका वर्षात देशात 10 हजार 349 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. देशात झालेल्या एकूण आत्महत्यांपैकी 7.7 टक्के आत्महत्या या शेतकऱ्यांच्या आहेत. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची बाब म्हणजे याहीवेळी देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रातच झाल्या आहेत.


शेतकरी आत्महत्या आणि एकूण आत्महत्या दोन्हींचं प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक राहिलं आहे. 17 हजार 972 हा महाराष्ट्रात 2018 या वर्षात झालेल्या एकूण आत्महत्यांचा आकडा आहे, त्यापैकी 3 हजार 594 या शेतकरी आत्महत्या आहेत. 35 टक्के शेतकरी आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. त्यानंतर तामिळनाडूचा क्रमांक लागतो. तामिळनाडूमध्ये 13 हजार 896 आत्महत्या झाल्या आहेत.


देशातल्या अनेक राज्यांनी आपल्या राज्यात शून्य शेतकरी आत्महत्यांची नोंद झाल्याचा आकडा दिला आहे. त्यात पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, उत्तराखंड, मेघालय, गोवा या राज्यांचा समावेश आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या तुलनेनं कमी आहे. 2018 या वर्षात शेती क्षेत्रात 9 हजार 528 पुरुष, तर 821 महिलांनी आत्महत्या केली आहे.


2015 नंतर शेतकरी आत्महत्येची आकडेवारी मोदी सरकार जाहीर करत नसल्याचा आरोप होत होता. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर नोव्हेंबरमध्ये 2016 चे आकडे आले, आता 2018 चे आकडे आलेत. 2016 मध्ये देशभरात 11 हजार 379 आत्महत्या झाल्या होत्या. 2017 या वर्षाची आकडेवारीही जाहीर करण्यात आली असून यावर्षात देशात 10 हजार 655 आत्महत्या झाल्या आहेत. त्यातील 5 हजार 955 आत्महत्या शेतकऱ्यांनी तर 4 हजार 700 आत्महत्या शेतमजूरांनी केल्या आहेत. यातील 3 हजार 701 आत्महत्या महाराष्ट्रातील आहेत.


संबंधित बातम्या : 


कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढतायत?

आत्महत्यांचं सत्र सुरुच, तीन महिन्यात 696 शेतकऱ्यांच्या आत्महत्या