अहमदनगर : सरकारने तीन वर्षात फक्त निर्णय घेतले, पण अंमलबजावणी दिसत नाही. सरकार ऑटो पायलट मोडवर निर्णय घेण्याचं म्हणत आहे, मात्र सरकार सायलेंट मोडवर गेलं आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ते अहमदनगरला बोलत होते.

सरकारच्या निष्क्रियतेने जनतेला अस्वस्थ करण्याचं काम केलं आहे. सरकारने जनतेला अस्वस्थ मोडवर नेऊन ठेवल्याचंही ते म्हणाले.

“बापटांचं वक्तव्य काळाची पावलं ओळखून

“पुढील वर्षी सरकार बदलण्याच्या गिरीश बापट यांच्या वक्तव्याचं अश्चर्य वाटण्याचं कारण नाही. काळाची पावलं ओळखून आणि वस्तुस्थितीला धरुन बापट यांनी विधान केलं आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता त्यांनीच सरकार बदलणार असल्याचं मान्य केलं आहे.”, असे विखे पाटील म्हणाले.

त्याचबरोबर, सरकारमधील दोन्ही पक्ष एकमेकांची औकात काढत आहे. त्यामुळे लोकांनी यांची औकात ओळखी आहे. धनगर समाज, मुस्लिम आणि मराठा समाजाचा आरक्षणाने अल्पसंख्याक समाज दुरावल्याचं ही त्यांनी म्हटलं.

सामाजिक सद्भाभाव टिकवण्यास सरकारला अपयश आलं आहे. त्याचाच उद्रेक भीमा-कोरेगावच्या आंदोलनात पहायला मिळाला. हा उद्रेक सरकार पुरस्कृत होता का, असा सवाल विखे पाटलांनी केला.

“राज्यात सध्या सामाजिक अशांतता पहायला मिळत आहेत. कर्जमाफीचा तीनतेरा वाजल्याने सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारकडून न्याय मिळत नसल्यानं शेतकरी ऐतिहासिक संपावर गेले. राज्यात केवळ मुख्यमंत्र्यांच्या व्यतिरिक्त प्रत्येक मंत्री आणि आमदारांत अस्वस्थता आहे. म्हणून गिरीश बापटांच्या प्रतिक्रियातून बांध फुटत आहेत.”, असे विखे पाटील म्हणाले.