सांगली : ‘संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांनी शिवरायांचा इतिहास विकृत करुन मांडला आणि त्यांचाच  कोरेगाव-भीमा इथल्या हिंसाचारामागे हात आहे.’ अशा शब्दात संभाजी भिडे गुरुजी यांनी आरोप केले आहेत. ते आज सांगलीमध्ये एबीपी माझाशी बोलत होते.


कोरेगाव भीमा इथं झालेल्या हिंसाचाराला आठ दिवस पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं अनेक प्रश्न आहे. आरोपींना अद्याप का अटक केली जात नाही, हिंसाचारामागे नेमकं कोण आहे, भिडे गुरुजींवर होणाऱ्या आरोपात तथ्य काय? या सर्व प्रश्नांबाबत भिडे गुरुजींनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत थेट उत्तरं दिली आहेत.

‘संभाजी बिग्रेड, मराठा सेवा संघ हे इतिहास बिघडवण्याचं काम सुरु’

‘काही जणांचा अमृतात माती कालवणं हा त्यांचा कायमचाच खटाटोप आहे. सगळा इतिहास बिघडवून सांगणं हे संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ हे अखंड काम करतायेत’ असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

‘कोरेगाव-भीमामध्ये शिवप्रतिष्ठानचा हात नाही’

‘जे घडलं ते सर्व आश्चर्यजनक होतं. असं काही घडेल याची कल्पनाही नव्हती. पण यामध्ये शिवप्रतिष्ठानचा अजिबात हात नाही.’ असं म्हणत भिडे गुरुजींनी आपल्यावरील आरोप फेटाळले.

‘प्रकाश आंबेडकर हे कुणीतरी सांगितलेलं बोलतायेत’

‘प्रकाश आंबेडकर हे कुणीतरी सांगितलेलं बोलत आहेत. त्यांचा बोलविता धनी कुणी तरी वेगळाच आहे. हे लक्षात घ्यायला हवं. नाहीतर उचलली जीभ लावली टाळ्याला असं ते बोलले नसते. कारण की, या संपूर्ण घटनेबाबत त्यांना फार काहीच माहित नाही. ’ असा गंभीर आरोप भिडे गुरुजींनी केला आहे.

‘शरद पवार हे अत्यंत विवेकी, बुद्धीवान नेते’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी भिडें गुरुजींच्या दिशेनं अंगुलीनिर्देश केलं होतं. यालाच उत्तर देताना भिडे गुरुजींनी शरद पवारांबाबतही मार्मिक शब्दात टिप्पणी केली. ‘शरद पवार सत्तेत नाहीत. शरद पवार हे अत्यंत विवेकी, बुद्धीवान आणि अतिशय धुरंधर नेते आहेत. ते असं काही करणार नाहीत याची मला खात्री आहे. पण मराठा मोर्चा, लिंगायतांचा स्वतंत्र धर्म, कर्जमाफी यामागे निसंशय: राजकारणी लोकं आहेत.’ असंही ते यावेळी म्हणाले.

‘अॅट्रॉसिटी कायदा रद्द करुन बघण्याची गरज’

‘आपण एकदा प्रयोग करुन बघूयात ट्रॉयल अॅण्ड एरर मेथड. अॅट्रॉसिटी कायदा गेली 70 वर्ष सुरु आहे. तो रद्द करायचा आणि पुढे 35 वर्षात काय होतं ते बघायचं. त्याचे परिणाम काय वाईट आणि काय चांगले ते आपल्याला समजेल. कोणतीही गोष्ट सत्य आहे की नाही हे ट्रायल अॅण्ड एरर मेथडनं पाहिलं जातं. तसं बघावं आपण लोकशाहीचा प्रयोग हा हुकूमशाहीपेक्षा चांगला की वाईट हे पाहावं आपण. हा कायदा थेट नामशेष करावा असं माझं म्हणणं नाही. पण लोकसभा, राज्यसभेत त्यावर चर्चा व्हावी आणि मग त्यावर काही ते निर्णय घ्यावं. असं माझं म्हणणं आहे’ असंही भिडे गुरुजी यावेळी म्हणाले.

‘गुणवत्तेवर आरक्षण दिल्यास देशाचं कल्याण’

‘याच वेळी त्यांनी आरक्षणाबाबतही परखड मत व्यक्त केलं. देशात गुणवत्तेला आरक्षण देणं गरजेचं आहे. कारण तसं आरक्षण दिल्यास देशाचं कल्याण होईल. आर्थिक आरक्षणाबाबत काय सुरु आहे हे आपण पाहतोच आहे. त्यामुळे देशात गुणवत्तेच्या आधारावर आरक्षण दिलं गेलं पाहिजे.’ असं भिडे गुरुजी म्हणाले.

‘सत्तेची चटक लागलेले नेते सध्या अस्वस्थ आहेत’

याच मुलाखतीत भिडे गुरुजींनी विरोधकांवरही टीका केली. ‘ब्राम्हण व्यक्ती मुख्यमंत्री आहे म्हणून विरोधकांना त्रास नाही. तर त्यांना सत्तेची चटक लागली आहे. आता सत्ता हाती नसल्यानं ते नेते सध्या अस्वस्थ आहेत. पण आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे यापुढे सत्ता मिळवण्यासाठी ते पुन्हा एकदा प्रयत्न करतली.’ अशी थेट टीकाही भिडे गुरुजींनी केली.

‘मला ‘त्या’ इतिहासाबाबत शून्य माहिती’

दरम्यान, वढू गावातील ज्या गोविंद गोपाळ यांच्या समाधीवरुन वादाला सुरुवात झाली होती. त्याबाबत भिडे गुरुजी सावध भूमिका घेतली. ‘गोविंद गोपाळ यांच्या समाधीबाबत फार काही माहित नाही. मला त्या इतिहासाबद्दल शून्य माहिती आहे. मी तिथे फक्त संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या समाधीचं दर्शन घेतो.’ असंही ते म्हणाले.

VIDEO :