मुंबई : कोविन (Cowin) अॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे लाखो लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे भारत सरकारने लसीकरण अ‍ॅपचे संपूर्ण विकेंद्रीकरण करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.  कोविन-अ‍ॅप मध्ये अनेक तांत्रिक त्रुटी येत आहेत. लॉगिन व 'OTP'साठी विलंब अशा अनेक तक्रारी येत आहेत.


एका मध्यवर्ती अ‍ॅपवरून जवळपास 1.3 अब्ज भारतीयांची वेळेवर नोंदणी होणे, हे अत्यंत आव्हानात्मक आहे. या परिस्थितीत महत्त्वपूर्ण अशा लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रणाली मर्यादित स्वरूपाची असून त्यातील त्रुटी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले आहे.


COWIN App Registration | लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची?


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक राज्याला स्वतंत्र अ‍ॅप तयार करून द्यावे किंवा महाराष्ट्र सरकारला स्वतःची अ‍ॅप निर्माण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली होती. केंद्र सरकारने यावर तात्काळ विचार करावा, असेही जयंत पाटील म्हणाले.


Co-WIN अॅपमधील गोंधळामुळे स्थानिकांचं लसीकरण मागे पडतंय : बाळासाहेब थोरात


याआधी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्याचं अॅप असावं अशी मागणी केली होती. राज्यातील लसीकरणात कोविन अॅपमुळे गोंधळ वाढत आहे. जिथे लस उपलब्ध आहे तो स्लॉट दिसल्यावर लोक लसीसाठी बुकिंग करत आहेत. यामुळे मोठ्या शहरातून छोट्या तालुक्यात लसी घ्यायला नागरिक येत असल्याचं चित्र महाराष्ट्रात आहेत. यामुळे स्थानिकांचं लसीकरण मागे पडत आहे, असं  बाळासाहेब थोरात म्हणाले.


कोविन अॅपमुळे हे गोंधळ वाढत आहेत. राज्यावर 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाची जबाबदारी आहे तर लस कशी द्यायची याचं व्यवस्थापन राज्याने करायला हवं. राज्यात जिल्हा बंदी असताना लसीकरणसाठी नागरिक एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात आहेत. हा गोंधळ केंद्राच्या कोविन अॅपमुळे होत आहेत. हे अॅप बंद झालं किंवा राज्याने आपलं अॅप तयार केलं तर प्रश्न सुटतील अशी भूमिका काँग्रेस मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे..