jayant patil : ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक करायचे होते, ती जागा मीच शोधून काढली आहे. मी त्या कमिटीचा अध्यक्ष होतो. त्या जागेवर देशाचे पंतप्रधान यांनी जलपूजन आणि जागा पूजन केले आहे, पण अद्याप काही झालेलं नाही. पूर्वी शिवस्मारकाचे केलेलं डिझाईन बदलण्यात आले, त्यापूर्वी केलेले डिझाईन अतिशय उत्तम आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य केले होते, पण ते डिझाईन बदलून सरदार पटेल यांच्यापेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं, आता आमचं सरकार आल्यावर आम्ही त्यात लक्ष घालू, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. 


स्मारक शोधण्यासाठी संभाजी राजे हजारो समर्थकांसह मुंबईत


दरम्यान, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणीसाठी आठ वर्षे उलटूनही काम पुढे का सरकलं नाही? असा सवाल करून संभाजीराजे यांनी आज भाजपला धारेवर धरले. ते म्हणाले की, "केंद्रात आणि महाराष्ट्रात (भाजपचे) सरकार आहे, पण तरीही काम झालं नाही," स्मारक शोधण्यासाठी संभाजी राजे हजारो समर्थकांसह मुंबईत दाखल झाले होते. सरकारी अधिकारी आणि पोलिसांशी चर्चा केल्यानंतर राजे यांना त्यांच्या 50 समर्थक आणि शिवप्रेमींना घटनास्थळी भेट देण्याची परवानगी देण्यात आली. संभाजी राजे म्हणाले की, 24 डिसेंबर 2016 रोजी मोदींनी जलपूजन केले, पण ते आजही काहीच काम झालेलं नाही. प्रस्तावित प्रकल्प खडकाळ जमिनीवर आहे. भू पातळी सरासरी समुद्रसपाटीपासून 8 मीटर पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.


कसं असेल शिवस्मारक? 


मरीन ड्राइव्ह उर्फ ​​नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग किंवा क्वीन्स नेकलेस, एका बाजूला ऐतिहासिक मलबार हिल्स आणि दुसऱ्या बाजूला नरिमन पॉइंटपासून, अरबी समुद्रात एक किलोमीटर अंतरावर हा पुतळा असेल. पुतळा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा उंच असेल, असे प्रस्तावित आहे. 
भारतीय नौदल, मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, BHNS इंडिया, मत्स्य विभाग, भारतीय तटरक्षक दल, मुंबई पोलीस आयुक्त, वने आणि पर्यावरण यासह डझनभर मंत्रालय, विभाग आणि संस्थांकडून परवानग्या आणि एनओसीमुळे हा प्रकल्प गुंतागुंतीचा आहे. स्मारकाचे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. या स्मारकात संग्रहालय, प्रदर्शन गॅलरी, ॲम्फी थिएटर, हेलिपॅड आणि हॉस्पिटल असेल. या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती दाखवल्या जाणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या