मुंबई : राज्यात गेल्या 19 दिवसांपासून सुरु असलेला सत्तासंघर्ष अखेर संपला आहे. शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे राज्यपालांकडे पोहोचले आहेत. त्यामुळे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर आहे. उद्या नव्या महाशिवआघाडीची बैठक होणार आहे, यामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.


सकाळपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरु होता. सत्तेचा सस्पेन्स शिगेला पोहोचला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. अखेर शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिवसेनेला समर्थनाचं पत्र राज्यपालांना पाठवलं आणि राज्यात महाशिवआघाडीवर शिक्कामोर्तब केलं आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनाला आज संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. मात्र डेडलाईन संपण्यासाठी आधीच शिवसेना सत्तास्थापन करण्यात यशस्वी झाल्याचं स्पष्ट झालं आहे.


एबीपी माझा लाईव्ह स्ट्रीमिंग


विधानसभा निवडणुकीत 105 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. अपक्षांच्या पाठिंब्यासह भाजपचं संख्याबळ 118 वर पोहोचलं होतं. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं होते. मात्र शिवसेनेशिवाय पुरेसं संख्याबळ नसल्याने भाजपने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शवली. भाजपच्या नकारानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी काल निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आज दिवसभर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला होता. मात्र अखेरीस काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेना सत्तास्थापन करणार जवळपास निश्चित झालं आहे.


शिवसेनेचे 56 आमदार आहेत, तर त्यांच्याकडे 8 अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आहे. असे मिळून शिवसेनेकडे 64 आमदारांचे संख्याबळ आहे. राष्ट्रवादीकडे 54 तर काँग्रेसकडे 44 आमदारांचे संख्याबळ आहे. तिन्ही पक्षांकडे मिळून 162 आमदारांचे संख्याबळ आहे. राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी 144 आमदारांची आवश्यकता आहे.


VIDEO |  शिवसेना अशी का वागली?