मुंबई : शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून मुख्यमंत्री आमचाच होईल, असा पुनरुच्चार खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सोबतच भाजपला सत्तास्थापनेची संधी आहे, तिचा लाभ त्यांनी घ्यावा, असा टोलाही लगावला. काल 9 नोव्हेंबरला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी भाजपला निमंत्रण दिले. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.


राज्यातील परिस्थिती पाहता आता राज्यपालांच्या पुढाकारानेच राज्याला सरकार मिळू शकते. भाजपने सत्तास्थापनेसाठी थांबण्याची गरज नव्हती. यापूर्वी स्पष्ट बहुमत नसतानाही अनेक राज्यांत भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला होता, असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.राज्यपालांनी दिलेल्या संधीचा भाजपने लाभ घ्यावा, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी राज्यात मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

आम्ही बहुमत विकत घेऊ शकतो, हा भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटला, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेची तयारी आहे की नाही याबाबत 11 तारखेला रात्री 8 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले असल्याचीही माहिती राऊत यांनी दिली आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राज्यासाठी योगदान असल्याचे सांगत त्यांनी या पक्षांचे कौतुक केले. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांची आज दुपारी 12.30 ला मालाडमधील रिट्रीट हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

शिवसेनेकडून देखील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग -
राज्यात सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपला निमंत्रण दिलं आहे. भाजपकडून सत्तास्थापनेबद्दल अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. दरम्यान, भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेकडून देखील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मध्यरात्री मातोश्रीहून शिवसेना आमदारांशी चर्चा करण्यासाठी मालडच्या रीट्रीट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. चर्चेनंतर आदित्य ठाकरे रीट्रीट हॉटेलमध्येच मुक्कामाला आहेत.

संबंधित बातम्या -

महाराष्ट्रात 'महाशिवआघाडी'चं सरकार येणार? शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांकडून संकेत

आदित्य ठाकरे मध्यरात्री सेना आमदारांच्या भेटीला; चर्चेनंतर हॉटेलमध्येच मुक्काम

Government Formation | भाजपला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून निमंत्रण