Bakari Eid Holiday: बकरी ईदची (Bakari Eid) सुट्टी बुधवारी देण्याचा निर्णय शासनाकडून रद्द करण्यात आला आहे. तर बदलेल्या निर्णयानुसार आता ही सुट्टी आता गुरुवारी देण्यात आली आहे. शासनाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शासनाकडून बुधवारी म्हणजेच 28 जून रोजी बकरी ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पण बकरी ईद ही गुरुवारी म्हणजेच 29 जून रोजी आहे. त्यामुळे बुधवारची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. तर ही सुट्टी बकरी ईदच्या दिवशीच म्हणजेच गुरुवारी 29 जून देण्यात आली आहे.  


दरम्यान आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आणि बकरी ईद यंदा एकत्र आले आहेत. त्यामुळे शासनाकडून बकरी ईदची सुट्टी बुधवारी आणि आषाढी एकादशीची सुट्टी गुरुवारी जाहीर केली होती.  परंतु हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने या सणांच्या सुट्ट्यादेखील एकाच दिवशी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता एकाच दिवशी सार्वजनिक सुट्टी मिळणार आहे.


काय आहे बकरी ईदचं महत्त्व? 


रमजान पवित्र महिन्यानंतर म्हणजेच 70 दिवसांनी बकरी ईदचा सण साजरा करण्यात येतो. या सणाला ईद-अल-अजहा किंवा ईद-उल-जुहा असंही म्हटलं जातं. आजच्या दिवशी नमाज पठण केल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. या दिवशी गरीब लोकांना जेवण दिलं जातं. या कुर्बानीची तीन हिस्स्यांमध्ये विभागणी केली जाते. एक हिस्सा गरीबांना, दुसरा हिस्सा मित्रांना, नातेवाईकांना आणि तिसरा हिस्सा हा स्वत:कडे ठेवला जातो. 


हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ ईद-उल-अजहा साजरी केली जाते. हजरत इब्राहिमने अल्लाहच्या आज्ञेवर निष्ठा दाखवण्यासाठी आपला मुलगा इस्माईलचा बळी देण्याचे मान्य केले होते. हजरत इब्राहिम जेव्हा आपल्या मुलाचे बलिदान देण्यासाठी पुढे निघाले तेव्हा देवाने त्यांची निष्ठा पाहून इस्माईलच्या बलिदानाचे दुंबेच्या बलिदानात रूपांतर केले. इस्लामच्या धार्मिक श्रद्धेनुसार हजरत इब्राहिम अल्लाहचे पैगंबर होते. 


यंदा कुर्बानी न देण्याचा निर्णय


दरम्यान यंदा बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने राज्यात अनेक ठिकाणी आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम समाजाकडून घेण्यात आला आहे. मुस्लिम समाजामध्ये कुर्बानीला मोठं महत्व असून त्यासाठीच बकरी ईद हा सण साजरा केला जातो. पण यावेळी मुस्लिम समाजाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी; मुस्लीम समाजाने घेतला कुर्बानी न करण्याचा निर्णय