कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. फरारी आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 10 लाखांचं बक्षीस सरकारच्या वतीने देण्यात येईल, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला अडीच वर्षे झाली. मात्र, पोलिसांच्या हाती ठोस पुरावा लागला नाही. या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र, त्याची जामिनावर मुक्तता झाल्याने पोलिसांच्या हाती सध्या पुरावा आणि आरोपी नाहीत.

या प्रकरणातील संशयित आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर हे दोन वर्षांपासून फरार आहेत. या दोन आरोपींची माहिती देण्यासाठी पोलिसांनी जनतेला आवाहन केलं आहे. या दोघांची माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे- 020-25634459, अप्पर पोलीस अधीक्षक कोल्हापूर- 0231-2656173, तसेच पोलीस उपनिरीक्षक रमेश ढाणे (SIT टीम) – 9823502777 या क्रमांकावर देणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

पानसरे दाम्पत्यावर हल्ला

16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉ. पानसरे दाम्पत्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी ते राहत असलेल्या सागरमळा परिसरात दोन बंदुकीतून प्राणघातक हल्ला केला होता.  या हल्ल्यात गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा जखमी झाल्या होत्या. मात्र कॉ. पानसरे गंभीर जखमी होते.

त्यांच्यावर कोल्हापुरातच उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी कॉ. पानसरेंना मुंबईला आणण्यात आलं होतं. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना शुक्रवारी 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. तब्बल पाच दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही.

कोण होते कॉम्रेड गोविंद पानसरे?

– कॉम्रेड गोविंद पानसरे हे डाव्या चळवळीतलं मोठं नाव

– श्रीरामपूरच्या कोल्हार गावात जन्म

– कोल्हारमध्येच सातवीपर्यंतचं शिक्षण

– विवेकवाद, बुद्धीप्रामाण्य आणि पुरोगामी विचारवंत

– शालेय जीवनात राष्ट्रीय सेवा दलाकडे पानसरेंचा कल

– कम्युनिस्ट पक्ष संघटना, मार्क्सवादी विचारांवर भर

– कामगार संघटना, जनसंघटना उभी करत पक्ष वाढीचं काम

– कोल्हापूर आणि परिसरात १० ते १५ कामगार संघटना

– कोल्हापुरातील गुंडगिरीविरोधात कॉ. पानसरेंचा मोर्चा

– अभ्यासू वक्ता, लेखक, प्रबोधक आणि आंदोलक अशा विविध भूमिका

– 21 पुस्तकांच्या माध्यमातून कॉम्रेड कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले.