ST Strike : महाविकास आघाडी सरकार असताना एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शिंदे सरकारला घरचा आहेर दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्य मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने मुख्यमंत्र्यांना हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 


सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर, तर कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत आहेत. दरम्यान, एसटी कर्मचारी विलीनीकरण आंदोलना दरम्यान मान्य केलेल्या 16 मागण्या अद्याप मान्य न केल्यामुळे उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने मुख्यमंत्र्यांना मागण्या मान्य करण्यासाठी आठवण करून दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय आमदारांची समिती स्थापन करण्यात आली होती. यावेळी 18 पैकी 16 मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून कोणतीच कार्यवाही न झाल्याने सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. 


मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनही निर्णय नाही 


दरम्यान, मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी 18 ऑक्टोबर रोजी चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर बैठकीचे आश्वासन देऊनही कोणताच निर्णय झाला नसल्याने तसेच प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्याची परिस्थिती पाहून 19 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषणाचा निर्णय घेतल्याचे सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने पत्रात म्हटले आहे.


एसटी महामंडळाचे 118 बडतर्फ कर्मचारी पुन्हा सेवेत


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी एसटी महामंडळाने (MSRTC) 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं होतं. या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सेवेत घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत एसटी कर्मचाऱ्यांनी आपला आनंद व्यक्त केला. यावेळी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनीही राज्य सरकारचे आभार मानले. दरम्यान, या कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांनंतर पुन्हा सेवेत घेतलं जाणार असून पूर्वीच्याच जागी आणि पदावर कामावर रुजू करुन घेतलं जाणार आहे.


एसटी कर्मचाऱ्यांचा संप


मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात संप पुकारला. एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण व्हावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी तब्बल 6 महिने एसटी संप सुरु होता. 23 डिसेंबरपर्यंत कर्तव्यावर येण्याचं आवाहन महामंडळाने केलं होतं. परंतु बहुतांश कर्मचाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली. परिणामी राज्यातील एसटी वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी 24 डिसेंबरपासून महामंडळाने कर्मचाऱ्यांवरील कारवाईला सुरुवात केली. मात्र याला न जुमानता कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने राज्यात सर्वत्र संप सुरु ठेवला होता. हळूहळू बहुतांश कर्मचाऱ्यांवरील कारवाया मागे घेण्यात आल्या. मात्र 118 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार होती. अल्टिमेटम देऊन सुद्धा कर्मचारी कामावर रुजू होत नसल्याने एकूण 118 कर्मचाऱ्यांना कामावरुन बडतर्फ करण्यात आलं होतं.


इतर महत्वाच्या बातम्या