मुंबई : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत चणकापूरमध्ये एका कुख्यात गुंडाची मंदिराच्या आवारातच हत्या करण्यात आली. चणकापूरमधील प्रसिद्ध हनुमान आणि शनी मंदिराच्या आवारात आज पहाटे ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुख्यात गुंड अशोक उर्फ गधा पासवानला परिसरातील इतर तीन गुन्हेगारांनी अत्यंत निघृणपणे मारले आणि नंतर त्यांचे मुंडके छाटून घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर एका दुसऱ्या मंदिराच्या जवळ फेकून दिले.
नागपूर जिल्ह्यातील चणकापूरमधील प्रसिद्ध हनुमान आणि शनी विस्तीर्ण आवारात हनुमान मंदिराच्या मागे किचन शेड (स्वयंपाकाचे शेड) आहे. आज पहाटे जेव्हा परिसरातील लोक जागे झाले, तेव्हा या किचनशेडला लागून परिसरातील कुख्यात गुंड गधा पासवानचे धड रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर गधा पासवानच्या मृतदेहाचे मुंडके त्या ठिकाणी नव्हते. कुख्यात गुंडाची मंदिराच्या आवारात हत्या झाल्याची बातमी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुंडक्याचा शोध सुरु केला आणि तो घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर लांब नाग मंदिराच्या जवळ आढळून आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, गधा पासवान रात्री गावातील एका ठिकाणी नामकरणाच्या कार्यक्रमात गेला होता. त्याच कार्यक्रमात खापरखेडा परिसरातील रोहित सूर्यवंशी, आशिष वर्मा आणि सुरज वरणकर हे गुंडही आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास हे तिघे गधा पासवानसोबतच बाहेर निघाले होते. त्यामुळे रात्री या सर्व गुन्हेगारांमध्ये कुठल्या तरी कारणाने भांडण होऊन गधा पासवानची हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हत्येची घटना मंदिरात घडल्यामुळे आणि मुंडकेही दुसऱ्या मंदिराजवळ आढळल्यामुळे काही लोक यामागे काही अघोरी कृत्य असण्याची शक्यताही व्यक्त करत आहेत. मात्र, पोलिसांनी सध्या तरीही शक्यता फेटाळून लावली आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसात गुन्हेगारांमधील आपापसातील संघर्षात गुंडांच्या हत्येची ही दुसरी घटना आहे. दोनच दिवसापूर्वी हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत दिघोरीमध्ये पलाश दिवटे या गुंडाची अभय राऊत या कुख्यात गुंडाने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हत्या केली होती. त्यामुळे नागपुरात पोलिसांची निष्क्रियता आणि गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये सक्रियता असे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे.