औरंगाबाद : समन्यायी पाणीवाटपानुसार जायकवाडी धरणामध्ये नगर आणि नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करून पाणी सोडण्यासंदर्भात हालचालींना वेग आला आहे. गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत. सोमवारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची बैठक झाली होती, त्यानंतर कार्यकारी संचालकांना आदेश देण्यात आले. त्यानुसार मंगळवारी कार्यकारी संचालकांनी आदेश दिले आहेत.

एकूण किती पाणी सोडणार?

जायकवाडी धरणामध्ये विविध धरणांमधून पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मुळामधून 54 दलघमी 1.90 टीएमसी, प्रवरामधून 109  दलघमी 3.85 टीएमसी, गंगापूर धरणातून 17 दलघमी 0.60 टीएमसी, दारणा धरणातून 57.50 दलघमी 2.04 टीएमसी, पालखेड समुहातून 170 दलघमी 60 टीएमसी असं एकूण 254 दलघमी (8.99 टीएमसी) पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोणत्या नियमाने मिळणार जायकवाडी धरणात पाणी?

राज्यातील जलसंपत्तीचे विनियमन करण्याकरिता जलसंपत्तीचे कुशल, समन्यायी आणि टिकाऊ व्यवस्थापन वाटप आणि वापर करण्याकरिता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम 2005 पारित करण्यात आला. राज्यातील भूपृष्ठावरील, भूगर्भातील पाणी वापराचं नियमन करणे, जलसंपत्तीचे कायदेशीर, समन्यायी आणि शाश्वत व्यवस्थान वाटप करणे, पाणी वापरासाठी दर निश्चित करणे आणि पाणी वापराचे हक्क प्रदान करणे यासाठी हा कायदा आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण यांच्या नियमानुसार समन्यायी पाणी वाटप हा कायदा करण्यात आलाय. त्यानुसार प्रत्येक धरणात पावसाळा संपल्यावर किती पाणीसाठा असावा याचा निर्णय घेण्यात येतो.

2011-12 ला मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी पहिल्यांदा समन्यायी पाणी वाटप प्रश्न ऐरणीवर आला आणि वाद सुरू झाला. मराठवाडा जनता विकास परिषदेने जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी याचिका दाखल केली. त्यावेळी कोर्टाच्या आदेशाने पाणी सोडण्यात आलं. यावर्षी पाऊस कमी झाल्याने मराठवाड्यात पुन्हा एकदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पण वरच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांचा विरोध आहे.

नगर, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा आजचा पाणीसाठा

गंगापूर  88.67 %

दारणा   92.97%

मुकणे  73.09%

भंडारदरा  93.16 %

निळवंडे  85.59 %

मुळा 66.62%

करंजवन 93.89%

जायकवाडी धरण आज 36.62% टक्के पाणीसाठा आहे.